सोलापूर : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी नागरिकांनी दाखल केलेल्या अर्जांवर योग्य निर्णय होण्याची अपेक्षा असते. मात्र विहीत पध्दतीने लोकशाही दिनात केवळ एक किंवा दोनच अर्ज सुनावणीसाठी समोर येत आहेत. या दोन अर्जांवर निर्णय घेण्यासाठी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे तीस अधिकाºयांची टीम बसलेली दिसून येते. लोकशाही दिनात नागरिकांच्या अर्जांवर योग्य ती कारवाई होत नसल्याने लोकशाही दिनास नागरिकांचाही प्रतिसाद कमी होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनासाठी निर्णय प्रक्रियेसाठी घेण्यात आलेला अर्ज संबंधित अर्जदाराने तहसील कार्यालयात १५ दिवसांपूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. तहसील कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याचे दिसून आल्यास असे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही दिनात सुनावणीसाठी घेण्यात येतात. मात्र विहित नियमात केवळ एक-दोन अर्जच समोर येत असल्याने यावरच लोकशाही दिन संपते. लोकशाही दिनात न्याय मिळेल या अपेक्षेने आलेल्या नागरिकांच्या तक्रारी निवेदन स्वरुपात स्वीकारुन त्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठविण्याचे काम लोकशाही दिनात होते.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या लोकशाही दिनात माळशिरस तालुक्यातील केशरबाई इंगवले यांचा अर्ज निर्णयासाठी घेण्यात आला होता.महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेतील डाळिंब लागवडीसाठी परमीट देण्याचा त्यांचा विषय होता. या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक यांनी एक महिन्यात अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले.
मागील लोकशाही दिनात सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील दत्तू गवळी यांच्या अर्जावरही यावेळी सुनावणी घेण्यात आली. घरजागेची नोंद कमी कशी झाली असा त्यांचा विषय होता. याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी नागरिकांकडून आलेले ५७ अर्ज स्वीकारून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी हे अर्ज संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले.
मागील लोकशाही दिनात नागरिकांकडून १0७ निवेदन देण्यात आले होते. हे सर्व निवेदन संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले होते. मात्र या निवेदनावर नेमकी कोणती कार्यवाही झाली याची कोणतीच माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे नसल्याचे दिसून आले.
आंदोलनाचा टॉवर काढण्याचा प्रयत्न - विविध मागण्यांसाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी येतात. तालुकास्तरावर किंवा अन्य विभागाकडून काम न झाल्याची भावना त्यांच्यात असते. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतरही आपली दखल घेतली जात नसल्याने काही तक्रारदारांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील मोबाईलच्या टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार घडत आहे.
सोमवारी लोकशाही दिनातही असा प्रकार घडल्याने याविरोधात आत्मदहन करणाºयांविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सध्या बिनकामी असलेला तो टॉवर काढण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.