सोलापूर : मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी बाबत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस दिली आहे. यामुळे मातंग समाजाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेश सचिव सुरेश पाटोळे यांनी व्यक्त केला आहे.
मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व इतर बाबीचा विकास व्हावा यासाठी अभ्यास आयोगाची स्थापना २००३ मध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आयोगाची स्थापना केली. मात्र, राज्य सरकारने निर्माण केलेल्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी शासनाने लागू केल्या नव्हत्या. या विषयात उच्च न्यायालयाने लक्ष घालून महाराष्ट्र शासनास नोटीस जारी केली आहे. त्यामुळे या शिफारशी लागू झाल्यास मातंग समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे पाटोळे यांना सांगितले.
आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या रंगाबाद खंडपीठाने शासनाच्या प्रधान सचिवासह सामाजिक न्याय विभागाच्या सचिवास नोटीस काढून महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे ८२ पैकी ६८ शिफारशी लागू करणे संदर्भात म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी एप्रिलमध्ये ठेवण्यात आले आहे. तरी याबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून या शिफारशी बाबत कार्यवाही करावी या विषयी मातंग समाजाचे शिष्टमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती प्रमुख,आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सुरेश पाटोळे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किसन नाना पाटोळे, शहर अध्यक्ष विजय अडसुळे, महिला शहर अध्यक्ष संगीता कांबळे, किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे, तुकाराम गेजगे, उत्तर तालुका अध्यक्ष बापूजी गायकवाड आदी उपस्थित होते.
------------