: विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत ज्वारी मूल्यवर्धन प्रकल्पामधील ज्वारी प्रक्रिया उद्योगावर जिल्हा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यात उत्पादित मालावर प्रक्रिया करून केल्यास जास्त नफा होईल, असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. माढा तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मोहोळ कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्डूवाडीतील उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयात हे प्रशिक्षण पार पडले.
यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) मदन मुकणे व कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दिनेश क्षीरसागर यांनी ज्वारी प्रक्रिया व त्यापासून तयार होणारे उपपदार्थ याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी पिकलेल्या शेतमालावर प्रक्रिया करून तो थेट ग्राहकांना विकावा. त्यासाठी कृषि विभाग शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करेल. यापुढे कृषि मालाचे पणन व विक्री आणि प्रक्रिया याबाबतच कामकाज राहील, अशी ग्वाही उपविभागीय कृषि अधिकारी रवींद्र कांबळे यांनी दिली. कृषी विभागामार्फत चालू असलेल्या विविध योजनांची माहिती तालुका कृषि अधिकारी सूर्यभान जाधव यांनी दिली.
याप्रसंगी कृषि सहायक कादंबरी भालेराव, मंडल कृषि अधिकारी हनुमंत बोराटे, कृषि सहायक माधवी पाटील, कृषि सहायक विशाल गावडे यांनीही विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास तडवळे, भोसरे, कुर्डू, कुर्डूवाडी, महादेववाडी, रोपळे येथील शेतकरी गटाच्या महिला सदस्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आनंद झिने यांनी केले.कार्यक्रमासाठी तंत्र अधिकारी सदाशिव सोनवर, कृषि पर्यवेक्षक विजय गवळी यांच्या पथकाने परिश्रम घेतले.
नऊ गावांत २३ ज्वारी प्रकल्प
मंडल कृषि अधिकारी कुर्डुवाडी कार्यालयांतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेंतर्गत ९ गावांमध्ये १० हेक्टरचे २३ ज्वारी प्रकल्प घेण्यात आलेले आहे. त्याच ठिकाणी आत्मा अंतर्गत रब्बी हंगामात ७ गावांमध्ये ७ शेतीशाळा घेण्यात आल्या.