सोलापूर: शहराच्या जवळून जाणारा राष्टÑीय महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरत असला तरी रखडलेल्या कामांमुळे तो धोकादायक ठरु लागला आहे. गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या कामामुळे मार्केट यार्डपासून जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटरचा रस्ता धोक्याची घंटा देत अपघाताला निमंत्रण देऊ लागला आहे. कधी होणार हा रस्ता अन् या वाहतुकीची कोंडी असा सवाल करू लागले आहेत.
मार्केट यार्डापासून पुढे हैद्राबादकडे जाणाºया या हायवेचे काम गेल्या वर्षापासून या ना त्या कारणाने रखडले आहे. जिथे हे सुरु आहे ते अगदी संथगतीने चालू आहे. शहराच्या जवळचा आणि रहदारीने नेहमीच गजबजलेल्या या मार्गावर अनेक ठिकाणचा रस्ता खोदून ठेवल्यामुळे रोड अरुंद बनला आहे. यामुळे पुण्याहून येणारी अवजड वाहने, शहराकडून या भागातील विविध नगरांकडे असणारी दुचाकी, चारचाकी आणि पादचाºयांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याशिवाय या रोडवर मार्केट यार्ड असल्यामुळे जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून खरेदी-विक्रीसाठी येणारी मालाची वाहतूक या साºयांची एकच गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. शहराजवळचा भाग आणि वर्दळीचे ठिकाण पाहता प्राधान्याने या परिसरातील रस्त्याचे काम हाती घेणे गरजेचे असताना याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असाही आरोप या परिसरातील रहिवाशांमधून होऊ लागला आहे.
काय दिसते नित्याचे चित्र- सोलापूर मार्केट यार्ड ते चाचा हॉटेलपर्यंत रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात ट्रक उभारलेले असतात आणि दुसºया बाजूला पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरही अशाच प्रकारे वाहनांची गर्दी असते. या प्रकाराबद्दल अनेकवेळा वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचे गाºहाणे या परिसरातील रहिवासी करीत आहेत. याशिवाय हैदराबाद रोड ते मार्केट यार्डच्या दिशेने येत असताना डाव्या बाजूला ट्रान्स्पोर्ट आहेत. यामुळे जोपर्यंत त्यांच्या ट्रकमध्ये माल भरला जात नाही तोपर्यंत परराज्यांतून आलेले हे ट्रक तेथेच थांबतात. एक ट्रक भरून गेला तर दुसरा ट्रक तेथे येतोच. यामुळे रस्त्याच्या कडेची जागा म्हणजे जणू ट्रकसाठी पार्किंगच आहे. या ट्रकमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच रस्ता खोदल्यामुळे आणखी भर पडली आहे. हे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यावर प्रभावी यंत्रणा राबवली जावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
मार्केट यार्डपासून ते चाचा हॉटेलपर्यंत रोडच्या कडेला मालट्रक थांबतात. त्यामुळे दररोज आम्हाला कसरत करीत ये-जा करावी लागते. मनस्ताप सहन करावा लागतोय. वाहतूक पोलीस थांबत नाही. या नेहमीच्या त्रासापासून सुटका व्हावी.- रमेश माळी, विडी घरकूल