सोलापूर : भाषा ही व्यक्त होण्याचे माध्यम आहे. ती कोणावरही जबरदस्तीने लादता येत नाही़ सध्या तरुणाई जी ‘हिंग्लिश’ (इंग्रजी मिश्रित हिंदी ) बोलत असतील तर ते त्यांना बोलू द्यावे़ यामुळे हिंदी भाषेवर कोणताही परिणाम होणार नाहीच पण यातूनच हिंदी भाषाही अधिकच समृद्ध होत जाईल़ हिंदी ही संपर्क भाषा आहे़ याला दक्षिण भारतात जो विरोध होत आहे याला राजकीय आणि आर्थिक कारण आहे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते निशिकांत ठकार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
सध्या इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा असल्याने या भाषेचा ट्रेंड जरी असला तरी देशात दिवसेंदिवस हिंदी भाषेचा वापर वाढत आहे़ केंद्र सरकारही हिंदी भाषेचा वापर जास्त व्हावा यासाठी प्रोत्साहन देत आहे़ यामुळेच शैक्षणिक संस्था, केंद्र सरकारच्या कार्यालयात हिंदी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.पण राज्यातील स्थानिक भाषांनाही तितकेच महत्त्व आहे़ सोलापुरातही हिंदी भाषेचा विकास व्हावा यासाठी सोलापूर विद्यापीठाकडून २०१८-१९ शैक्षणिक वर्षापासून हिंदी पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत़ याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
सध्याची जागतिक भाषा म्हणून इंग्रजी असली तरी भारतीय म्हणून हिंदी भाषेचा सन्मान करणे, ती भाषा वाढावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. राष्ट्रभाषेचा वापर करणे ही अभिमानाची बाब आहे, असे मत प्रा. ममता बोल्ली यांनी व्यक्त केले.
चित्रपटसृष्टीमुळे हिंदी वाढत राहीलहिंदी भाषेचे महत्त्व हे आपोआप वाढेल. ही भाषा माध्यम आणि चित्रपटसृष्टीमुळे आपोआप वाढत आहे़ यामुळे याला मुद्दामहून वाढवण्याची गरज नाही़ गरजेनुसार ही मिक्स भाषा तयार होते हे स्वाभाविक आहे़ यामुळे यात शुद्धीकरण खूप महत्त्वाचे नाही़, असे मत व्यक्त झाले.
सोलापुरातील हिंदीचे विद्वान
- - निशिकांत ठकार - महाराष्ट्र हिंदी अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, मानव संशाधन मंत्रालय, नवी दिल्लीचा हिंदी भाषा लेखन पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
- - डॉ़ इरेश स्वामी - सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणूनही त्यांची ओळख आहे़ त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे़ याचबरोबर त्यांनी हिंदीतून अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे. सोबतच अजूनही देशातील अनेक विद्यापीठात ते मार्गदर्शन करत आहेत, सोलापुरात हिंदी विकास मंचाची स्थापना करून हिंदीचा प्रचार व प्रसार करत आहेत.
- - बंडोपंत पाटील - महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सोलापूरच्या महासचिवपदी कार्यरत आहेत.
- डॉ़ प्रा़ जयश्री शिंदे - यांचे हिंदीच्या पत्रिकात लेख प्रसिद्ध झाले आहेत़ अशा अनेकांमुळे सोलापूरचे नाव देशपातळीवर घेतले जात आहे, अशी माहिती प्रा़ दादासाहेब खांडेकर यांनी दिली.