राजकुमार सारोळे
सोलापूर : शेळगीतील चाकोते नगरातील गणपती मंडळापुढे नाचणारा ललित राजू स्वामी हा हीपहॉप स्टार बनला आहे. सहावीत असल्यापासून नाचण्याचे वेड लागलेल्या ललितला शाळेत गॅदरिंगमध्ये नाकारण्यात आले. याचा राग मनात धरून आपण एक दिवस स्टार बनायचे हे स्वप्न घेऊन तो मुंबईत गेला. दीड वर्षे झोपडपट्टीत राहून भटकत राहिला. अखेर त्याला हीपहॉप डान्स तांत्रिक शिक्षण देणारी संस्था मिळाली अन् तो आता वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे.
राजू स्वामी यांचे भवानीपेठेत मेडिकल दुकान आहे. त्यांचा मुलगा ललित. शिक्षण बीए पर्यंत झालेले. त्याला लहानपणापासून नाचण्याचे वेड लागले. शेळगीतील चाकोतेनगरातील गणपती मंडळासमोर घेण्यात येणाºया डान्स स्पर्धेत त्याने प्रथम भाग घेतला. टीव्हीवर मायकल जॅक्सनचा डान्स पाहून त्याचे हे वेड आणखी वाढले. सन २0१२ मध्ये सोलापुरात एका कार्यशाळेसाठी प्रशिक्षक कार्तिक राजा आले होते.
ललितने त्यांची भेट घेऊन हीपहॉपमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. दहावीनंतर ये असे त्यांनी सांगितले. हे डोक्यात ठेवून दहावीनंतर तो मुंबईत गेला व स्कूलसाठी दीड वर्षे फिरला. किंग्जमध्ये त्याची प्रॅक्टिस बघून सीजीन रमेश, कार्तिक प्रियदर्शनी यांनी संधी दिली. किंग्ज युनायटेड ज्युनिअर टीममध्ये सहभागी केले. या टीमचे अँकरिंग चांगल्याप्रकारे केल्याने आता त्याच डान्सस्कूलमध्ये ललित शिक्षक म्हणून काम करत आहे. वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले.
ललितने मुंबईत किंग्ज युनायटेड डान्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे तांत्रिक प्रशिक्षण घेऊन वर्ल्ड चॅम्पियनची तयारी सुरू केली आहे. किंग्जच्या स्क्वॉड ज्युनिअर टीमचे तो अँकरिंग करतो आहे. कोलकात्ता, दिल्ली येथे त्याचे शो झाले. कारगिल दिनाच्या शोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती.
ललितला डान्सचे लहानपणापासून वेड आहे. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने आई विजयालक्ष्मीला चिंता वाटत होती. शाळेत गॅदरिंग प्रवेश नाकारल्यावर शिक्षकांसमोर त्याने डान्स केला. मुंबईत जाऊन झोपडपट्टीत राहिला. - राजू स्वामी
मनात पॅशन असेल तर काहीच अशक्य नाही. हीपहॉपचे प्रशिक्षण मिळण्यासाठी मी बरेच फिरलो. प्रयत्नानंतर यश मिळाले. अभिनेता शाहरूख खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आता करिना कपूर, बॉस्को मॉर्टिस, रफ्तार यांच्यासमोर काम करतो आहे. - ललित स्वामी