पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करणार्या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या जीवनपटाचा उलगडा करण्यासाठी डिव्हीपी उद्योग समुहाच्यावतीने पंढरपूर मध्ये पहिल्यांदाच शिवपुत्र संभाजी या ऐतिहासिक महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान हे प्रयोग होत असल्याची माहिती चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
महाराजा शंभूछत्रपती प्रोडक्शन, पुणे निर्मित, महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेते खासदार अमोल कोल्हे हे साकारणार आहेत. लॉकडाऊन नंतर राज्यातील हा पहिलाच प्रयोग होत आहे. हॉटेल विठ्ठल कामतच्या समोरील चंद्रभागा मैदानावर सायंकाळी ६ वाजता या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. या महानाट्यामध्ये ३५० कलाकारांसह स्थानिक १५० कलाकारांचा सहभाग राहणार आहे. घोडे, लढाया असे अनेक जीवंत देखावे व ऐतिहासिक प्रसंग दाखवले जाणार आहेत. या महानाट्याचे आजपर्यंत १९४ प्रयोग झाले आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळत ६ बाय ६ फुटावर खुर्च्या टाकून आसन व्यवस्था केली आहे. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे, लेखक महेंद्र महाडिक, महेश पवार आदी उपस्थित होते. (वा. प्र.)
---