सोलापूर : अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेद्वारे २८ व २९ जानेवारी २०२३ ला नाशिकमध्ये होऊ घातलेल्या नवव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदासाठी कामगार नेते तथा सामाजिक विचारवंत इरफान रशीद शेख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सोलापुरातून साहित्यिक मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती देण्यात आली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिकमध्ये जोरदार पाऊस व खराब हवामान असण्याची शक्यता असल्यामुळे डिसेंबरमध्ये होणारे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलत २८ व २९ जानेवारी २०२३ मध्ये घेण्याचे ठरले आहे, अशी माहिती संयोजक डॉ. फारूक शेख यांनी दिली.
संमेलनापूर्वी यासाठी विविध स्पर्धाचंं आयोजन करण्यात येत आहे. त्याच्या विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात संमेलन होणार आहे, यात लेखक गीतकार जावेद अख्तर, माजी कुलगुरू फैजान मुस्तफा, सिनेस्टार नसिरोद्दीन शहा, रजा मुराद यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्याबाबत व परिसंवादातील विषय, त्याचे वक्ते, स्मरणिका समिती स्थापन करणे व आतापर्यंतचे सर्व माजी संमेलन अध्यक्षांना निमंत्रित करणे अशा महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस डॉ. इ. जा. तांबोळी, डाॅ. जावेद कुरेशी, प्राचार्य शकील शेख, अय्युब नल्लामंदू, डाॅ. युसूफ बेन्नूर, मुबारक शेख, डॉ. घोडराव, डॉ. नामोले, कलीम अजीम यांनी चर्चा केली.
---------
संमेलन अध्यक्षांची २७ नोव्हेंबरला घोषणा
नाशिक येथे नववे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड येत्या २७ नोव्हेंबर २०२२ ला मुंबई / सोलापूर येथे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार असल्याचे समितीचे सचिव अय्युब नल्लामंदू, सहसचिव मुबारक शेख, उपाध्यक्ष डॉ. तांबोळी, खजिनदार हसीब नदाफ, सदस्य डॉ. युसूफ बेन्नूर, डॉ. सुरय्या परवीन जहागीरदार, मजहर अल्लोळी यांनी ‘लोकमत’शी बाेलताना सांगितले.