सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात एचआयव्हीबाधित रुग्णांवर अत्याधुनिक व अधिक परिणामकारक उपचार होणार आहेत. यासाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वायरल लोड लॅब सुरु करण्यात येणार आहे. या लॅबसाठी ‘नॅको’ (नॅशनल एड्स कंट्रोलर आॅर्गनायझेशन) यांच्यातर्फे यंत्रसामुग्री देण्यात आली आहे.
एचआयव्हीच्या रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी नॅकोने पुढाकार घेतला आहे. राज्यातील एआरटी प्लस सेंटरमध्ये वायरल लोड आधारित उपचार पद्धती सुरु करण्यात येत आहे. या लॅबमुळे रुग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने, परिणामकारक उपचार करता येतील. ही लॅब महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात सुरु करण्यात येणार असल्याचे विभाग प्रमुख डॉ. जी. ए. पंडित व एआरटी प्लस सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस यांनी सांगितले. वायरल लोड लॅबमध्ये असणाºया एन.सी.आर. मशीनमधून (न्यूक्लिक अॅसिड एक्स्ट्रॅक्शन मशीन) व्हायरसमधील न्यूक्लिक अॅसिड बाहेर काढले जाते. हे न्यूक्लिक अॅसिड पीसीआर (पॉलीमरेज चेन रिअॅक्शन मशीन) मशीनमध्ये काही रसायनासोबत प्रक्रिया केली जाते. यानंतर रक्तामध्ये किती विषाणू आहेत हे समजते. लॅमीनर एयरफ्लो, वोर्टेक्स मिक्सर आदी साहित्य मिळून वायरल लोड लॅब तयार होते.
एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही झाल्यानंतर त्याच्या रक्तामध्ये विषाणूंची संख्या किती असते हे मोजण्यात येते. या विषाणूंच्या संख्येवरून उपचाराची दिशा ठरविली जाते. वायरल लोड (विषाणूंची सख्या) मोजण्यासाठी दर सहा महिन्यांनी मशीनद्वारे चाचणी करावी लागते. कारण, एचआयव्हीचा विषाणू शक्तिशाली असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढल्यास रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास, एचआयव्ही झाल्यानंतर दिल्या जाणाºया औषधांचा परिणाम पाहण्यासाठी, संक्रमण झाल्यानंतर शरीरात होणारे बदल जाणून घेण्यासाठी, गर्भवती महिलेक डून तिच्या बाळाला एचआयव्हीची लागण होऊ नये यासाठी आदी कारणांसाठी वायरल लोड चाचणी केली जाते.
वायरल लोड म्हणजे काय ?- एचआयव्ही व्हायरस लोड टेस्टिंग रक्तातील एचआयव्ही जेनेटिक मटेरिअल (आरएनए)चे प्रमाण मोजते. विषाणूंचे प्रमाण किती आहे? याचा अहवाल देतो. बाधित व्यक्तीमध्ये एड्सची जोखीम कमी करायची, याचा पुरावा हा वायरल लोड देतो. वायरल लोडच्या अहवालामुळे डॉक्टरांना कशा पद्धतीने उपचार करावा हे समजते. तसेच यामुळे शरीरात वाढणाºया विषाणूंचा वेगही समजण्यास मदत होते. यापूर्वीच्या पद्धतीमध्ये सीडीफोर मोजला जात होता. यात विषाणूने शरीराला किती नुकसान केले हे मोजले जात होते.
वायरल लोड लॅब लवकरात लवकर सुरु करण्याचा आमचा मानस आहे. या लॅबसाठी आवश्यक असणाºया तज्ज्ञांच्या नेमणुकीसाठीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एचआयव्ही रुग्णांना अधिकाधिक अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालय व महाविद्यालयाकडून प्रयत्न केले जात आहेत.- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय