कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा उतरवा, त्यांची सेवा पुस्तिका प्राव्हिडंट फंड, राहणीमान भत्ता फरक सुधारित किमान वेतन लागू करावा, अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियनच्यावतीने सोमवारी तालुका पंचायतसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
हे आंदोलन जिल्हा स्तरावर सुरू असून, बार्शी येथे राज्य उपाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष विकास शिंदे यांच्या नेत्रत्वाखाली सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या १०२९ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीत अडीच हजार कर्मचारी विविध पदांवर काम करत आहेत. सध्या गावपातळीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे कर्मचारी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करत आहेत. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही. या मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात तालुकाध्यक्ष विकास शिंदे, सचिव आबासाहेब सोलनकर, रामा चौधरी, विलास गव्हाणे, विकास शेंडगे यांच्यासह अनेक सदस्य सहभागी झाले आहेत.
----