शीतलकुमार कांबळे
सोलापूर - जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात गठीत केलेल्या समितीच्या निवडीच्या पत्राची होळी केली. या होळीच्या भोवती बोंब ठोकून समितीचा निषेध करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या आवारात आज शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी व कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी संपाचा दुसरा दिवस पाळण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला कर्मचारी अश्विनी शिंदे, उषा भोसले, सविता मिसाळ, आरती माडेकर, अंजली पाटील, श्रीमती रांजणे, लक्ष्मी शिंदे, अंजली पेठकर, प्रज्ञा कुलकर्णी, अंजली पाटील, कर्मचारी संघटनेचे अरुण क्षीरसागर, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, सचिन जाधव यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
जुनी पेन्शन लागू करा, वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करा, मागास वर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती देणे अशा विविघ मागण्यांसाठी आक्रोश करण्यात आला. गोलाकार पध्दतीने उभे राहून कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या आदेशाची होळी करणेत आली. बक्षी समितीने केलेल्या शिफारशी यापुर्वीच कर्मचारी यांचेवर अन्याय करणारे आहेत. पुन्हा बक्षी यांना समितीवर घेतल्यामुळे कर्मचारी यांचे मध्ये संतापाची लाट होती.