सोलापूर : सोलापुरात आता टपरी किंवा अन्य कोणत्याही दुकानात विडी, सिगारेट सुटी करून विकण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
राज्यात लोक मोठ्या संख्येने धूम्रपानाकडे वळत आहेत. यात तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, शाळेतील मुले मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या व्यसनाकडे वळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुकानातून एक किंवा दोन अशा सुट्या स्वरुपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत तर लोक तितक्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन होणार नाहीत.
शासनाने यापूर्वीच शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. आता सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर २४ सप्टेंबरच्या अधिसूचनेने बंदी घातली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर तत्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात सर्व विभागात विभागीय अधिकारी यांच्यामार्फत व स्वच्छता निरीक्षकांच्या मार्फत या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाºया टपरी व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यक तेथे गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.