सोलापूर : युद्धग्रस्त युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांची सुट्टी दिली आहे. ही सुट्टी ११ मार्चला संपणार असून पुढे ऑनलाईन लेक्चर घेण्याचे नियोजन केले आहे. पुढील सहा महिने ऑनलाईन लेक्चर घेऊ, अशा सूचना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राध्यापक हे युक्रेनमधील स्थानिक आहेत. त्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. विद्यार्थी युक्रेनमध्ये असताना युद्धग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तिथल्या विद्यापीठाने दोन आठवडा सुट्टी जाहीर केली होती, ही सुट्टी एक मार्च ते १५ मार्चपर्यंत आहे. सुट्टी संपल्यानंतर ऑनलाईन क्लास घेऊ, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. सध्यातरी युक्रेनमधील परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे ११ तारखेनंतर ऑनलाईन क्लास तरी होतील का याची शाश्वती नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
----
सहा महिन्यांनंतर काय ?
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून युक्रेनमधील बहुतांश विद्यापीठाने ऑनलाईन लेक्चर घेण्याचे ठरविले आहे. सहा महिन्यांनंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यास पूर्वीप्रमाणे महाविद्यालयात बोलावता येईल, असा त्यांचा विचार आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे शक्य होईल, असे वाटत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
----
युक्रेनमधील विद्यार्थ्यांना देशातच शिकवावे - आयएमए
इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण भारतातच देण्याची विनंती केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यातील खासगी व शासकीय महाविद्यालयात सामावून घ्यावे. त्या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता तात्पुरती वाढवावी, अशी विनंती आयएमएने केली आहे.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्हाला दोन आठवडे सुट्टी दिली आहे. ही सुट्टी संपल्यानंतर पुढे लेक्चर कसे घेणार याबाबत सांगतिले. युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मार्च आणि सप्टेंबर असे दोन बॅचमध्ये प्रवेश देतात. ज्यांचा प्रवेश मार्चमध्ये त्यांचे वर्ष संपले असून त्यांना नवीन वर्षासाठी प्रवेश घ्यावा लागतो. सप्टेंबर बॅचच्या विद्यार्थ्यांचे सेमिस्टर अजून संपलेले नाही.
- अक्रुर कदम, विद्यार्थी, डेनप्रो युनिव्हर्सिटी, युक्रेन.
जास्त मुले त्यांच्या त्यांच्या देशात परत गेली तर ऑनलाईनचा विचार करू, असे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, याबद्दल अद्याप अधिकृतरीत्या सांगण्यात आले नाही. आम्हाला ११ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली असून त्यावेळी कशी परिस्थिती असेल हे पाहण्यात येईल. त्यानंतरच पुढच्या शिक्षणाविषयी सांगण्यात येईल.
- प्रसाद शिंदे, विद्यार्थी, चर्नीवेस्ट युनिव्हर्सिटी, युक्रेन.