दुखवी ना कोणा | ना करी घात |
पवित्र जगात | तोचि जाणा || २५१.५ || (अभंगगाथा)
काही माणसे एखाद्याचे मन दुखवतात. एखाद्याचे घर बुडवितात. पाप धुण्यासाठी गंगा नदीत स्नान करतात. यामुळे पाप संपणार आहे काय ? चंद्र गंगेच्या जवळ असतो. त्याचा कलंक संपला का ? हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना, जो कोणाचेही मन दुखवत नाही. कोणाचाही घात करत नाही. तोच परमपवित्र आहे.
आपण पवित्र असावे. ही अनेकांची इच्छा असते. पवित्र होण्याचा मार्ग शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी सांगितला आहे. आपल्याकडून एखाद्याचे मन दुखविले जाते. आपल्यामुळे त्याच्यावर काय आघात झाला हे आपल्या लक्षातही येत नाही. काहीजणांना एखाद्याचा घात करायची सवय लागलेली असते. या दोन्ही गोष्टी आपल्याला सदैव दुःखी करणाऱ्या आहेत. मुळात आपण पवित्र असतो. या दोन गोष्टींमुळे आपले पावित्र्य नष्ट होते.
श्री बसवलिंग म्हणतात, ' पवित्र ते कुळ पवित्र तो देह | जेथे सदा राहे शिवभक्ती || ५९.१ || शिवाची भक्ती करणाऱ्याला सिद्धरामेश्वरांनी सांगितलेला मार्ग मिळतो. त्या मार्गाने तो आणि त्याचे कुळ पवित्र होते. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, ' पवित्र तो देह वाणी पुण्यवंत | जो वदे अच्युत सर्वकाळ || १०४९.१ || नामस्मरणाने शिवयोगी सिद्धरामेश्वरांना अपेक्षित असलेले पावित्र्य प्राप्त होते.
न दुखवू मन | न करु आघात |
मग येई आत | समाधान || १ ||
त्यासाठी घेऊ | मल्लय्याचे नाम |
होई सारे काम | निश्चितच || २ ||
सिद्धदास म्हणे | होऊया पवित्र |
तेव्हा मिळे छत्र | मल्लय्याचे || ३ ||
- डॉ. अनिल काशीनाथ सर्जे, सोलापूर