सोलापूर : सध्या कोरोनामुळे सर्वत्र नैराश्येचे वातावरण असताना प्रत्येकाच्या मनामनात भक्ती जागृत करून प्रसन्न करणाऱ्या श्रावण महिन्याला सोमवार (दि. ९ ऑगस्ट)पासून प्रारंभ होत आहे. श्रावण महिना अनेक व्रतवैकल्ये आणि सणांनी सजलेला आहे. ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या सोलापूरनगरीत या महिन्याला अतिशय महत्त्व आहे. विशेष म्हणजे सासुरवासीनींना सणांनिमित्त माहेरी येणारी संधी देणारा हा महिना आहे.
कोरोनाचे सावट असल्याने यंदा श्रावण महिन्यात मंदिरात जाऊन देवदेवतांचे दर्शन घेण्याची संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. शुक्रवार, १३ ऑगस्टला नागपंचमीचा सण आहे. यादिवशी महिला नागदेवतांची पूजा करतात. रविवार, २२ ऑगस्टला नारळी पौर्णिमा तसेच बहीण व भावातील प्रेम अद्विगुणित करणारा रक्षाबंधनचा सण आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याची ओवाळणी करते. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. सोलापुरात या दिवशी पद्मशाली बांधवांचे कुलदैवत मार्कंडेय महामुनीचा रथोत्सव साजरा केला जातो; पण यावरही उत्सवावरही कोरोनाचे सावट आहे.
३० ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती व ३१ ऑगस्टला गोपाळकाला आहे. ६ सप्टेंबर रोजी पोळा हा सण आहे. या दिवशी बळिराजांची पूजा करण्यात येते. याचदिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होते.
---------
श्रावणातील सण व उत्सव
- ९ ऑगस्ट - श्रावणमासारंभ/पहिला श्रावणी सोमवार
- १२ ऑगस्ट - नागचतुर्थी उपवास
- १३ ऑगस्ट - नागपंचमी
- १६ ऑगस्ट - दुसरा श्रावणी सोमवार
- १७ ऑगस्ट - मंगळागौरी पूजन
- १८ ऑगस्ट - पुत्रदा एकादशी
- २२ ऑगस्ट - नारळी पौर्णिमा/रक्षाबंधन
- २३ ऑगस्ट - तिसरा श्रावणी सोमवार
- ३० ऑगस्ट - चौथा श्रावणी सोमवार
- ३१ ऑगस्ट - गोपाळकाला
- ०६ सप्टेंबर - पोळा/ श्रावण समाप्ती
----------