यात घडले असे की, नितीन घोडके (रा. कुरुल) हे ट्रॅक्टर चालक आहेत. कातेवाडी येथे एकाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात. दिवसभर नांगरट करून ते कुरुल येथे गावी येत होते. त्यांना मोहोळ - कुरुल रस्त्यावरील कुरकू पाटील यांच्या मंदिराजवळ एक मोबाईल सापडला. एवढा महागडा मोबाईल कोणाचा असावा, असा विचार त्यांनी केला. फोनलॉक असल्याने त्यांना संबंधित लोकांशी संपर्क करता आला नाही. तासाभराने या मोबाईलवर फोन आला की, मी पोलीस हेडकॉन्स्टेबल शीतल उघडे बोलतोय. मंद्रुप पोलीस ठाण्यात ड्युटीवर जात असताना रस्त्यात हा मोबाईल पडला आहे. या पोलिसाचा त्यांना विश्वास बसत नसल्याने त्यांनी या मोबाईलचे माझ्यासमोर लॉक काढा आणि मोबाईल घेऊन जा, असे सांगितले. या व्यक्तीच्या इमानदारीवर उघडे खूश झाले. महागडा मोबाईल त्यांना मिळालाच, पण एक कामगाराची इमानदारी या ठिकाणी पाहण्यास मिळत होती. दुसऱ्या दिवशी शीतल उघडे यांनी त्यांच्या मोबाईलचे लॉक काढले आणि घोडके यांनी त्यांचा सत्तर हजारांचा मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला.
कुरुलच्या ट्रॅक्टर चालकाची इमानदारी; सापडलेला ७० हजारांचा मोबाईल केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:27 AM