बार्शी (सोलापूर) - शहरातील स्वातंत्र्यपूर्वी स्थापना करण्यात आलेल्या मानाच्या आजोबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा स्वामी समर्थ प्रकटोत्सव हा पौराणिक देखावा सादर केला. मात्र, या देखाव्यावेळी या मंडळातील युवा कार्यकर्त्यांनी आपल्या मंडळातील सर्वच ज्येष्ठांना बोलावून त्यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन केलं. कुठल्याही नेता किंवा अभिनेत्याला तिलांजली देत मंडळाने आझाद गणेश मंडळांचा इतिहास सांगणाऱ्या ज्येष्ठ मंडळींना मानाचे स्थान दिलं. यावेळी सर्वच ज्येष्ठ सदस्य भावूक झाले होते.
शहरातील आझाद गणेश मंडळाची स्थापना 1942 झाली आहे. या मंडळाच्या मानाच्या आजोबा गणपतीने यंदा 77 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी श्री स्वामी समर्थ प्रकटोत्सव हा पौराणिक देखावा सादर केला. मात्र, या देखाव्यापेक्षा आगळे-वेगळे ठरलं ते या मंडळातील कार्यकर्त्यांचे सज्ञान अन् संकल्पना. आजोब गणपती हा शहरातील मानाचा गणपती असून येथील जुन्या काळातील गणपती म्हणून याची बार्शीत ओळख आहे. त्यामुळेच या गणपतीचे नावही आजोबा गणपती असे आहे. या मंडळातील कार्यकर्त्यांनी यंदा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना मानाचे स्थान देत या देखाव्याचे उद्घाटन केलं. म्हणजेच, आजोबांच्या हस्ते आजोबा गणपतीसमोरील देखाव्याचे उद्घाटन करुन अनोखा संदेश दिला आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना नेहमीच मानाचे स्थान द्यावे, त्यांचा सन्मान करावा, असेच या मंडळाने सूचवले आहे. मंडळातील कार्यकर्त्यांच्या संकल्पनेचे शहरातून कौतूक होत आहे. तसेच तरुणपिढीने आपल्याला दिलेला सार्वजनिक सन्मान पाहून ज्येष्ठ मंडळीही या देखावा उद्घाटन सोहळ्याला भावूक झाल्याचे दिसले. येथील नगरसेवक पृथ्वीराज राजपूत, अजिनाथ गायकवाड, माजी नगरसेवक संजय बरिदे यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र ढोले यांच्या संकल्पनेतून हा लक्षेवधी उद्घाटन सोहळा पार पडला.
या ज्येष्ठांच्या हस्ते उद्घाटनमंडळातील जेष्ठ उद्घाटक विश्वंभर नरके, ज्ञानेश्वर खोगरे, अॅड. विलास ठोकडे, प्रकाश शिराळ, सिद्धेश्वर खुडे, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र गाढवे, पट्टम चंदेले, दिलीप सदावर्ते, सतीश बरीदे, सुनील खुडे, नरेंद्र खुडे, सुनील फल्ले, भालचंद्र ढोले यांनी गणेशाचे पूजन केले.
दरम्यान, कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणाल नरके, लखन रजपूत, रुपेश सदावर्ते, महेश देसाई, सागर शिराळ, राम गलांडे, सोनल शिराळ, अक्षय बरीदे, राहुल गुजर, संतोष खोगरे, अॅड. आनंद ठोकडे आदींनी परिश्रम घेतले.