शिवानंद फुलारी
अक्कलकोट : मागील १५ दिवसांपासून सतत होणाºया पावसामुळे तालुक्यातील फळपिके आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ दुष्काळसदृश स्थितीत पाणीटंचाई असतानाही टँकरने पाणीपुरवठा करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग जगविली़ आज अक्कलकोट तालुक्यातील शेतकºयांच्या तोंडचा घास अतिवृष्टीने हिरावला आहे़ तालुक्यात ५०० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़ या नैसर्गिक संकटाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.
द्राक्ष म्हटलं की सर्वप्रकारच्या पिकांमधील नाजूक फळपीक. या पिकाकडे सर्वसामान्य शेतकरी शक्यतो वळत नाही. कारण खर्चिक पीक म्हणून याकडे पाहिले जाते. अलीकडच्या काळात शासनाकडून फळपिकांबाबत शेतकºयांना प्रोत्साहन मिळाल्याने द्राक्ष, डाळिंब या पिकांच्या क्षेत्रफळात मोठी वाढ झाली़ एखादे वर्ष वगळता अचानक रोगराई पसरण्याचे प्रकार घडत आहेत़ मात्र औषध फवारणी केल्याबरोबर तत्काळ सुधारणा होत असे. यंदा मात्र नेमके सर्वकाही उलटं होत आहे.
दरवर्षी औषधाच्या खर्चात तिपटीने वाढ होत आहे़ २४ सप्टेंबरपर्यंत म्हणावा तसा पाऊस झाला नाही़ द्राक्षाच्या काडीची वाढ व्यवस्थित झाली नाही. एकंदरीत द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, लिंबू यासह वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, बटाटे अशाप्रकारे ५०० हेक्टरवरील बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
आता मजुरांचा तुटवडा - गतवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे बागा जगवताना बागायतदारांना नाकीनऊ आले होते. दरम्यान, पावसाळ्यात पाऊस झाला नाही़ १० आॅक्टोबर २०१९ पूर्वी छाटणी केलेल्या बागावर दावणी, करपा यासारख्या रोगांचा प्रसार झाला आहे़ यामुळे हातातून बागा जाण्याच्या भीतीने महागडी औषध फवारणी केली आहे तसेच ज्यांनी १६ व १७ आॅक्टोबरदरम्यान बागांची छाटणी केली आहे त्यांच्या बागेवर मोठ्या प्रमाणात दावणी, करपा रोग फैलावला आहे. रोग पसरल्यानंतर तत्काळ आटोक्यात आणावे लागते. त्यासाठी मजुरांची फार मोठी गरज भासते. नेमके ते मिळत नाहीत. कमतरतेमुळे वेळेवर कामे होत नाहीत़ याचाही फटका शेतकºयांना बसला आहे.
फवारणीदेखील वाया...- रोज सायंकाळी पाऊस होत असल्याने रात्रभर द्राक्षाची पाने ओलसरपणा धरतात़ त्यात भर म्हणून सकाळी दव व धुके पडत आहेत़ द्राक्षावर मारण्यात आलेल्या औषधांचा फारसा परिणाम झालेला नाही़ फवारणीवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची सल आता शेतकºयांना आहे़
तडवळ, नागणसूर, जेऊर भागात सर्वाधिक बागायती- अक्कलकोट तालुक्यात नागणसूर, जेऊर, तडवळ, दुधनी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्रफळ आहे. अनेक वेळा मजुरांअभावी कामे वेळेत होत नाहीत. द्राक्ष बागायतदारांची संघटना असून, एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मजूर पुरवठा करण्याचे काम करतात़ यंदा मात्र मजूर मिळत नाहीत़