भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांचे स्थानिक पातळीवर दोन गट आहेत. यावेळी माजी आमदार दिलीपराव माने यांनीही स्वतंत्र पॅनल होटगी ग्रामपंचायतीमध्ये उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. तिन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका झडू लागल्या आहेत. सध्या ग्रामपंचायतीवर चिवडशेट्टी गटाची सत्ता आहे. या गटाला हरीश पाटील गटाने शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यात माने गटाने चाचपणी सुरू केल्यामुळे हरीश पाटील गट संभ्रमात पडला आहे.
हरीश पाटील आणि माने गटाच्या बैठकांना चिवडशेट्टी विरोधकांनी हजेरी लावून नेत्यांसमोरही संभ्रम निर्माण केला आहे. होटगी परिसराच्या राजकारणावर कोणत्या गटाचे वर्चस्व राहणार हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर ठरणार आहे. बाजार समिती, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्ही सत्तास्थानी पकड राखलेल्या रामप्पा चिवडशेट्टी यांच्यासाठी होटगीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.