सोलापूर - गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. 11 नंतर सुरू राहणाऱ्या हॉटेल, बारवर कारवाईचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
विवाह सोहळे, मंगल कार्यालये सुरू राहतील, मात्र पोलिसांची परवानगी काढावी लागेल. पूर्वीप्रमाणे 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा करता येणार आहे. मास्कचा वापर प्रत्येक ठिकाणी सक्तीचा असणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग कमी करण्यासाठी 7 मार्च 2021 पर्यंत जिल्ह्यात रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी करण्याच्या सूचना भरणे यांनी दिल्या. मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दवाखाने, औद्योगिक संस्था, औषधांची दुकाने सुरू राहतील असेही सांगण्यात आले आहे.