सोलापूर : वादळी वाऱ्यासह गारा, पाऊस पडून करमाळा तालुक्यातील सरपडोह येथे घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे. तसेच वाशिंबे येथील हरिदास झोळ यांच्या शेतातील दीड एकर केळी जमीनदोस्त झाली.
करमाळा तालुक्यातील सरपडोह येथे मंगळवारी रात्री उशिरा अवकाळी व मोसमी पावसाबरोबर वादळी वाऱ्यासह पावसाची रिमझिम झाली. वादळी वाऱ्यामुळे सरपडोह येथे हरिदास रघुनाथ रंदवे यांच्या घरावरील पत्रे उडून रस्त्यावर येऊन पडले. विजेची तारही तुटली. परंतु कुठलीही जीवितहानी झाली नाही. जेऊर परिसरातील निंभोरे, मलवडी वरखटणे, सौंदे, साडे, सालसे, कोंडेज, कुंभेज या परिसरात वादळी वाऱ्यांमुळे पिकांना फटका बसला. सध्या ज्वारी काढण्याचे दिवस चालू असल्यामुळे त्याही ठिकाणी नुकसान होत आहे.