तब्बल आठ महिन्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिर दीपावली पाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत किमान अंतर राखत दर्शन सुविधा उपलब्ध झाली.
सध्या विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शन घडविले जात आहे. त्यासाठी ऑनलाइन दर्शन पास बुकिंग करणे बंधनकारक केले. चैत्री, आषाढी, कार्तिकी यात्रा भाविकांविना पार पडली. पुन्हा विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू झाले आहे. यामुळे पंढरीत थोड्या प्रमाणात गर्दी होत आहे. ज्यांना शक्य नाही त्या मंडळींनी देव मनामनात जागवत भक्तिभाव जागवावा लागत आहे.
पंढरीच्या पांडुरंगानंतर महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती असलेल्या स्वामी समर्थांच्या दर्शनासंबंधी भक्तांना विरह सहन करावा लागला. आठ महिन्यांनी मंदिर पूर्ववत सुरू झाले. शासनाचे निर्देश पाळून देवाचं साजिरं रूप अंतर ठेवून का होईना मिळू लागलं आहे. मात्र कोरोनाच्या दडपणाखाली दर्शन घ्यावं लागत असल्याची सलही भाविकांमधून बोलून दाखवली जात आहे. गर्दी टाळावी यासाठी ठराविकच भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येत होते. आताही ‘श्री’ चे दोन वेळची विधीवत पूजा वगळता धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. आता तर पुन्हा मंदिर शासनाच्या आदेशानुसार बंद करावे लागले आहे.
जिल्ह्यात एकमेव असलेले भगवंत मंदिरही खुले केल्यानंतर दर्शनासाठी दररोज साधारण हजार ते दीड हजार स्थानिक भाविक येतात. बाहेरगावच्या भक्तांचे प्रमाण कमी आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन सुरू आहे. मंदिरात मास्कशिवाय प्रवेश नाही. दारात सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे.
----
भगवंत मंदिरात वेळ बदलली
एरव्ही शहरातील अनेक व्यापारी संध्याकाळी दुकान बंद केल्यानंतर रात्री आठ किंवा नऊनंतर दर्शनाला येत असत, मात्र या बदललेल्या वेळेमुळे हे लोकदेखील दिवसात जसा वेळ मिळेल तसे दर्शन घेऊन जातात. मंदिराच्या दोनपैकी एकाच दरवाजातून प्रवेश दिला जातो.
थेट मूर्तीपर्यंत भविकाना प्रवेश दिला जात नाही. पुजारी आणि भाविक यांच्यामध्ये अंतर राहावे यासाठी एक टेबल ठेवलेला आहे.
–-- - ––--------
देव, पुजारी अन् भाविकांमध्ये अंतर
- पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, बार्शीचे भगवंत मंदिर यासह गावोगावच्या मंदिरामध्येही सध्या देव, पुजारी अन् भाविकांच्या मध्ये अंतर ठेवून दर्शनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
----