सोलापूर: दरवाजा बंद करुन दूध आणायला बाहेर पडल्याची संधी साधत चोरट्यांनी रेल्वे स्टेशन मास्तराचे घर फोडून कपाटातील ३.५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे पैजण असे १ लाख ३८ हजारांचे दागिने चोरून लंपास केले. ही घटना गुरुवार, ११ रोजी सकाळी ११.१५ च्या सुमारास सांगोला येथे वासूद रोडवर कर्मवीर नगर येथे घडली. याबाबत, स्टेशनमास्तर गंगाकुमार मंगल सिंह (रा.सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी गंगाकुमार हे सांगोला रेल्वे स्टेशन येथे स्टेशन मास्तर म्हणून नोकरी करतात. दरम्यान ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सांगोला येथून ते स्वतः पत्नी, मुलगा व मुलगी यांना घेऊन सोलापूर येथे आले होते. ९ एप्रिल रोजी मुलीची परीक्षा असल्याने ते सोलापुरात आले होते. पत्नी व मुले सोलापूर येथील त्यांच्या मित्राकडे थांबले होते. गुरुवारी सकाळी ११ वाजता घरी आले व दूध आणण्यासाठी दरवाज्याला कडी लावून बाहेर गेले.
हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून बेडरूमच्या खोलीतील कपाटाचा दरवाजा उघडला. आतील ड्रावर उचकटून दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळे सोन्याची चैन, एक तोळे सोन्याचे कानातील फुले आणि १० भार चांदीचे पायातील पैंजण असे सोन्या चांदीचे दागिने घेऊन तेथून चोरट्यांनी पोबारा केला. थोड्या वेळाने गंगा कुमार सिंह घरी परतले तेव्हा त्यांना दरवाज्याला लावलेली कडी व दरवाजा उघडा दिसला. घरात जाऊन पाहिले असता बेडरूम मधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला.