साेलापूर : लॉकडाऊनमुळे थंडावलेला रिअल इस्टेट व्यवसाय हळूहळू आता पूर्वपदावर येऊ लागला आहे. श्रावण महिन्यापासून विविध सण-उत्सवांची रेलचेल सुरू होत असते. या महिन्यात उत्सवांना अक्षरशः उधाण येते. सण, उत्सवाचा मुहूर्त साधत अनेक लोक घर, जागा, शेती, प्लॅट खरेदी करतात. सध्या श्रावण महिन्यात रिअल इस्टेट (बांधकाम क्षेत्राला) चांगले वातावरण असून, लोक घर, जागा खरेदीला चांगली पसंती देत असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सुनील फुरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने अर्थव्यवस्था कोलमडली होती. एकही असे क्षेत्र नाही, जे कोरोनाच्या तडाख्यातून सुटलं असेल. यात बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राचाही समावेश होता. त्यामुळेच घर खरेदीलाही घरघर लागलेली होती. मात्र, ‘संकटात संधी असते’ या वाक्याप्रमाणे काही लोकांनी घर खरेदीसाठी हाच काळ निवडून घरांची खरेदी केली. नोकरी किंवा व्यवसाय करणारे तरुणही घर खरेदी करणं पसंत करीत आहेत. अनेक तरुण आपलं स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
------------
शहरापासून लांब अंतरावरील घरांसाठी मागणी
मागील काही वर्षांपासून सोलापुरात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी विस्तार वाढविला आहे. या कंपन्यात काम करणारे अधिकारी, कर्मचारी लोक घर खरेदीला प्राधान्य देत आहेत, शिवाय गुंतवणूक म्हणूनही अनेक लोक घर, जागा खरेदी करीत आहेत. शहरापासून लांब अंतरावर असलेल्या घरांना चांगली मागणी वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
-------------
म्हणून वाढल्या घरांच्या किमती...
- सिमेंट - सिमेंटच्या किमतीत ३० ते ४० टक्के वाढ झाली.
- स्टील - स्टीलच्या किमतीत प्रति किलो ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे.
- वाळू - वाळू मिळत नाही, शिवाय बाहेरील राज्यातील वाळूसाठी ज्यादा पैसे मोजावे लागत आहे.
- मजूर - मजुरांच्या पगारात वाढ झाली आहे, शिवाय कारागीरांनीही कामांसाठी ज्यादा पैसे मागत आहेत.
------------
घर खरेदीला चांगला वाव...
कोरोनामुळे रिअल इस्टेटचा थांबलेला व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येत आहे. नव्या घरांच्या किमती वाढल्या असल्या, तरी त्या सर्वसामान्यांना परवडणारे आहे. सोलापुरातील सर्वच बांधकाम व्यावसायिक चांगल्या दर्जाचे घर बनवित असून, लोकांनी आपल्या पसंतीनुसार घरांची निवड करून, नवे घर खरेदीला प्राधान्य द्यावे.
- सुनील फुरडे, क्रेडाई, राज्याचे अध्यक्ष, सोलापूर
--------
लॉकडाऊनमध्ये शिथिलता हवी...
सध्या सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचे निर्बंध लागू आहेत. दुपारी ४ नंतर लॉकडाऊन आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यास रिअल इस्टेट व्यवसायात नक्कीच वाढ होईल, शिवाय बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल, असे मत एका बांधकाम व्यावसायिकाने मांडले.