सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मंगळवारी, १४ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर झाला. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात अर्थसंकल्प सुरू होता. या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून एकच गोंधळ घातला. प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाबाहेर आंदोलन केले.
विद्यापीठावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी वेळीच रोखले. त्यांना गेट बाहेर घेऊन गेले. गेटवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना आंदोलनकर्ते विद्यापीठात कसे घुसले. आता याचा शोध विद्यापीठ घेणार आहे. त्याकरीता विद्यापीठाने चौकशी समिती नेमली असून समितीमार्फत चौकशी सुरू झाली आहे. सिनेट सदस्यांच्या गाडीतून आंदोलनकर्ते विद्यापीठ आवारात घुसल्याचा संशय प्रशासनाला आहे. त्यामुळे काही सिनेट सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.