पंचवीस वर्षांपूर्वी ती ज्यावेळी आॅफिसला आली, त्या दिवशी ती रडतच आली होती आणि मागच्या आठवड्यात ज्यावेळी ती आॅफिसला आली त्यावेळी देखील ती रडतच आली होती. पंचवीस वर्षांपूर्वी तिने नवरा गमावला होता आणि आठवड्यापूर्वी आली त्यावेळी ती मुलगा गमावण्याच्या भीतीत होती. दोन्हीला कारण प्रेमप्रकरणच! प्रेमा तुझा रंग कसा? तिच्या नशिबात प्रेमाचा रंग लालभडक रक्ताचाच होता.
पंचवीस वर्षांपूर्वी ती रडत रडत आॅफिसला आली. तिला वडिलांविरुद्ध व भावाविरुद्ध खुनाची केस करावयाची होती. तिच्या नवºयाचा तिच्या वडिलांनी व भावांनी जीप घालून खून केला, असे तिचे म्हणणे होते. ती सांगू लागली, तिचे वर्गातीलच एका परजातीतील मुलाबरोबर प्रेमप्रकरण होते. तिच्या घरात तिच्या लग्नाची ज्यावेळी चर्चा सुरु झाली, त्यावेळी तिने पळून जाऊन प्रियकराबरोबर विवाह केला. विवाह केल्याचे समजल्यानंतर तिच्या धनाढ्य व बलदंड वडिलांनी तिचे जिवंतपणीच श्राद्ध घातले. लग्नानंतर दोन महिन्यांच्या आत तिचा नवरा मोटरसायकलवरुन जात असताना एका जीपने त्याला धडक देऊन ठार केले. तिची खात्री होती की तिच्या वडिलांचे व भावांचेच हे कृत्य आहे.
कारण तिची आत्याच तिला म्हणाली होती, माझा भाऊ लई भडक डोक्याचा आहे. त्याचा पोरगाही बापापेक्षा भडक डोक्याचा आहे. दोघे म्हणत आहेत की, पोरीने इज्जत धुळीत घातली. जीप घालून तुझ्या नवºयाचा गेम करायचा त्यांचा प्लॅन आहे. खानदानच्या इज्जतीने तिचे कुंकू पुसून टाकले होते. कागदपत्र बघून मी तिला सांगितले की, तिच्या वडिलांविरुद्ध व भावांविरुद्ध काहीही पुरावा नाही. तिच्या आत्याने जर तिच्या वडिलांविरुद्ध व भावांविरुद्ध जबाब दिला तर काहीतरी करता येईल. ती म्हणाली, माझी आत्या माझ्या वडिलांविरुद्ध कदापीही जबाब देणार नाही. ती रडत रडत म्हणत होती आता मी काय करु? नवरा खलास झाला. पोटात त्याचं लेकरु वाढत आहे. मी आता कसे दिवस काढू? कोणीही माझ्या पाठीशी नाही. मी तिला म्हणालो, जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे. देवाच्या भरवशावर स्वत:च्या पायावर उभी राहा. ती रडत रडत आॅफिसमधून निघून गेली आणि गेल्या आठवड्यात परत आली. दुर्दैवाने तिची पाठ सोडली नव्हती. ती सांगू लागली, वकीलसाहेब प्रेमामुळे मी माझा नवरा गमावला आणि आता मुलगा गमवायची पाळी आली आहे. ती सांगू लागली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी स्वत:च्या पायावर उभी राहिले. हे शहर सोडून दुसºया गावाला गेले. सुदैवाने नोकरी मिळाली. गोंडस मुलगा झाला. त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. कष्टाने त्यास इंजिनिअर केले. एकटीने हे सर्व केले. त्यास चांगल्या पगाराची नोकरी लागली. अनेक वर्षांनी सुखाचे दिवस आले. आता मुलाचे लग्न करुन जरा आरामात या पुढील आयुष्य काढावे असा विचार करुन मुलासाठी स्थळ बघू लागले.
मुलगा स्पष्टपणे म्हणाला, माझे मी लग्न ठरविले आहे. कोण आहे मुलगी ? असे विचारले. त्याने नाव सांगताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या एरियातील एका श्रीमंत बलदंड इसमाची ती मुलगी होती. परजातीची होती. मी प्रेमापोटी माझा नवरा गमावला, आता मला मुलगा गमवायचा नव्हता. मी लग्नास विरोध केला तर तो म्हणतो लग्न केले तर त्याच मुलीशी करेन, नाहीतर जीवाचे बरेवाईट करुन घेईन. सांगा वकीलसाहेब पोराचे लग्न केले तर तिचा बाप त्याला खलास करेल आणि नाही केले तर तो जीवाचे बरेवाईट करुन घेईल. मला सांगा मी काय करावे? मी गप्प राहिलो. ती रडत रडत आॅफिसमधून निघून गेली.
तिच्या नशिबात प्रेमाचा रंग लालभडक रक्ताचाच होता... जीवनात कोठे थांबावे व कधी थांबावे याला फार महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीबद्दलही तसेच आहे. २०१६ पासून सुरु झालेल्या कोर्ट स्टोरीचा प्रवास कधीतरी थांबवायलाच हवा. २०१८ चा आजचा शेवटचा दिवस यासाठी मी निवडला आहे. कोर्ट स्टोरीला प्रचंड प्रतिसाद देणाºया वाचकांचे आणि कोर्ट स्टोरी लिहिण्याची संधी देणाºया व सहकार्य देणाºया ‘लोकमत’चे हृदयपूर्वक आभार. सायोनारा... -अॅड. धनंजय माने(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)