पंढरपूर : सध्या महाराष्ट्रावर कोरोना विषाणूचे संकट आले आहे. या कोरोना विषाणूचा नायनाट करण्याची ताकद फक्त विठ्ठला तुझ्याकडेच आहे. तुला तुझी लेकरे उपाशीपोटी झोपलेली कसे बघवत आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढ असे साकडे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठलाकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाबाबत परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री जितेंद्र आव्हाड हे पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठलाचे कळस दर्शन, नामदेव पायरीचे दर्शन व संत चोखा महाराज यांच्या समाधीला नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी तडफडतोय, शेतमजुरांना काम नाही. रोजंदारीवर जाणारा कामगार अन्ना विना उपाशी झोपतोय. अनेक लोक बेघर झाले आहेत, त्यांना उपाशी झोपण्याशिवाय पर्याय उरला नाही. महाराष्ट्रातील जनतेला या संकटातून बाहेर काढ. असे साकडेमहाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने घालण्यासाठी मी पंढरपुरात आलो आहे. परंतु विठ्ठलाचे मंदिर बंद असल्याने विठ्ठलाचा परमभक्त संत चोखा महाराज यांना नतमस्तक होऊन माझे साकडे विठ्ठलापर्यंत पोहोचव अशी विनवणी केली असल्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.