सोलापूर : वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर याचे नातू असल्याने मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे़, पण सत्ता कशी मिळवावी, हे त्यांनी माझ्याकडून शिकावे, अशी टिप्पणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सोलापुरात केली.
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये, मागासवर्गीय मतांचे विभाजन होणार असल्याने त्याचा फायदा भाजपा - शिवसेनेला होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या वंचित आघाडीत सर्व जातीच्या नेत्यांना सामावून घेतले असले तरी २००९ च्या माझ्या अनुभवनानुसार डोक्यात हवा व पैसा असणारे लोकच वंचित आघाडीकडे जातील़ त्यामुळे या आघाडीला फारसे यश मिळणार नाही, असे आठवले म्हणाले़ रिपाइं व वंचित आघाडीचा राजकीय समझोता होऊ शकेल काय? असे विचारले असता आठवले म्हणाले, ऐक्याची माझी तयारी आहे, मागे दोन ते तीन वेळा असे प्रयत्न झाले आहेत़ प्रकाश आंबेडकर याच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे, पण सत्तेची स्वप्न पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे.
२०१२ च्या निवडणुकीत शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांचा फिडबॅक घेतला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी मला काँग्रेसने तुम्हाला काय दिले? असा सवाल केला़ आपली वेगळी ओळख आहे, हे कार्यकर्त्यांनी पटवून दिल्यानंतर मी भाजपासोबत गेलो़ काँग्रेसवाल्यांनी भाजप हा जातीवादी पक्ष आहे, असा सातत्याने अपप्रचार केला़ भाजपामध्ये सर्व जातीधर्मांचे लोक निवडून आलेले असल्यामुळे मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी स्पष्ट केले.