सोलापूर : १३ ऑगस्ट २०२२ रोजी जालन्यात लोकअदालत आहे. तत्पूर्वी आपल्या वाहनावर असलेला दंड त्वरित भरा अन्यथा लोकअदालत कार्यक्रमात उपस्थित रहा, असा संदेश सोलापूरच्या चालकाला आल्याची माहिती समोर आली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकाच्या गाडीचा फोटो काढून ऑनलाईन दंड केला जातो. त्यासंदर्भातील संदेश गाडी चालकाच्या मोबाईलवर पाठविला जातो. त्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी काही कालावधीसाठी मुदत देण्यात येते. त्यानंतर दंड न भरल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा १९८७च्या कलम २० (२) अंतर्गत वाहनधारकास नोटीस पाठविली जाते. मात्र, गाडीचा नंबर जालन्यातील (एमएच २१ ए ५८३०) असा असताना दंडाची रक्कम भरण्यासाठीची नोटीस मात्र सोलापुरातील एका वाहनधारकाला आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या वाहनधारकाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
----------
मी सोलापुरात राहतो. मला रविवारी सकाळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्याकडून दंड भरण्याबाबतचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला. माझा गाडी नंबर वेगळा अन् दंडाचा संदेश आलेल्या गाडीचा नंबर वेगळा आहे. असे संदेश येत असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. असे चुकीचे संदेश येत असल्याचे अनेकांकडून मी ऐकले आहे.
- राजेंद्र कांबळे, वाहनधारक, सोलापूर
--------
खातरजमाच नाही होत...
अनेक वाहनधारकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेकदा दंड भरण्याबाबतचा संदेश प्राप्त होतो. गाडीचा नंबर, गाडीचा मालक याबाबतची खातरजमा न करताच संबंधित विभागाकडून वाहनधारकांना दंड भरण्याचा संदेश पाठवला जातो. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होतो, असेही सांगण्यात आले.