सोलापूर : कोरोनाची लक्षणे असलेल्या दोन रुग्णांचा अँटिजेन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र स्वॅब टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार सोलापुरातही घडला आहे. त्यामुळे मनपाचा आरोग्य विभाग कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची पुन्हा स्वॅब टेस्ट करण्यावर भर देत आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दोन प्रकारे टेस्ट केली जात आहे. घशातील स्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन कोरोनाची टेस्ट केली जाते. या टेस्टचा अहवाल मिळायला २४ तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो. यादरम्यान, रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू झाल्या. या टेस्टमध्ये अर्ध्या तासात अहवाल मिळतो, परंतु या अँटिजेन टेस्टच्या अहवालावर दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे तज्ज्ञ शंका उपस्थित करीत आहेत. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले.
रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होते ; मात्र एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास आम्ही तिथेच थांबत नाही. या व्यक्तीची तत्काळ स्वॅब टेस्टही केली जाते. शहरात गेल्या आठ दिवसांत कोरोनाची लक्षणे असलेल्या ३५ रुग्णांची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली. या सर्वांची स्वॅब टेस्ट केली असता त्यातील केवळ दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आगामी काळातही या पद्धतीनेच काम होईल.
अँटिजेन ही स्क्रीनिंग टेस्ट असल्यासारखीच आहे. त्यामुळे त्याबद्दल दक्षता घेतच आहोत. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची त्यामुळेच तर पुन्हा स्वॅब टेस्ट घेण्यावर भर दिला जात आहे. सर्व नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना याबाबत सूचनाही दिल्या आहेत.-डॉ. मंजिरी कुलकर्णी, आरोग्य अधिकारी, मनपा.