अक्कलकोट : अक्कलकोट - बॅगेहळ्ळी रस्त्यावर तलावातील पिचिंग दगड दिवसाढवळ्या पळविले जात आहेत. यामुळे पावसाळ्यात तलावाला धोका निर्माण होऊन फुटण्याची शक्यता असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या प्रकरणाची दखल घेत पाटबंधारे विभागाचे अधिकारी मुजावर यांनी तलावाला भेट देऊन पाहणी केली. ट्रक्टरच्या किती खेपा केल्या याचा पंचनामा करून वरिष्ठांकडे सादर केला आहे.
अक्कलकोटपासून चार किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत उजव्या बाजूला जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा एक लहान तलाव आहे. तलाव बांधताना पाणी झिरपावे. मात्र, तलावाला धोका होऊ नये म्हणून आतल्या बाजूला दगडाचे पिचिंग करण्यात आले. या कामाला अनेक वर्षे होऊन गेली. अलीकडे दगडांची चोरी होत असल्याने तो पावसाळ्यात फुटण्याचा धोका उद्भवला आहे. अशा काळात काही लोकांनी भरदिवसा या ठिकाणचे पिचिंग दगड ट्रॅक्टर ट्रालीतून पळविले. पावसाळ्यात दगडाच्या संरक्षणाअभावी तलावाला धोका उद्भवतोय. याबाबत ३१ मे च्या अंकातून ‘लोकमत’ने त्यावर प्रकाश टाकला. यावरून अक्कलकोट पंचायत समिती पाटबंधारेचे शाखा अभियंता ए.जे. मुजावर यांनी तात्काळ भेट देऊन पहाणी केली. किती खेपा दगड उचलले, याचा पंचनामा करून पंचायत समिती येथील वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे.
--
बॅगेहळ्ळी तलावतील पाच ते सहा खेपा दगड चोरीला गेले आहेत. त्याचा पंचनामा करून पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे, तसेच समर्थनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच राठोड, ग्रामविकास अधिकाऱ्यांनासुद्धा खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
-ए.जे. मुजावर, शाखा अभियंता, ल.पा. जिल्हा परिषद, सोलापूर
---
फोटो : ०२ बॅगेहळ्ळी
बॅगेहळ्ळी रस्त्यावरील तलावातील दगड चोरीप्रकरणी पाहणी करताना शाखा अभियंता मुजावर, ग्रामविकास अधिकारी बळोरगी, उपसरपंच राठोड.