लापूर : साठ दिवसांत ९० टक्के निधी कसा खर्च करणार, असा सवाल आमदारसुभाष देशमुख जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. आमदार बबनदादा शिंदे यांनी बांधकाम खात्याकडून निधी परत जाण्याची शक्यता असल्याचे सांगून बहुतांश निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करा, असे आवाहन केले. झेडपीला निधी खर्चाला एक वर्ष जादा मिळतो असेही शिंदे यांनी निदर्शनाला आणले. उमेश पाटील यांनी अतिवृष्टीची भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे सांगितले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी खर्चाचा आढावा घेतला. कोरोना साथीमुळे सोलापूर जिल्ह्याने केवळ ११ टक्के निधी खर्च केला असला तरी राज्याच्या तुलनेने हा खर्च एक नंबरवर आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गतवर्षी जिल्हा नियोजनतर्फे ४२४ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे या निधी खर्चावर निर्बंध घालण्यात आले. केवळ ३३ टक्के विकासकामावर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली. यात सर्वात जास्त रक्कम कोरोना महामारी प्रतिबंध करण्यासाठी वापरण्यात आली. ४४ कोटी ९९ लाख खर्च झाले आहेत. आता तरतुदीप्रमाणे उर्वरित निधी दिला जाणार असल्याचे ७ डिसेंबरला शासनाचे पत्र आल्याचे नमूद केले.
१५ टक्के निधी सडक योजनेसाठी
जिल्हा नियोजनची तरतूद असलेल्या रकमेपैकी १५ टक्के रक्कम मुख्यमंत्री सडक योजनेसाठी व ५ टक्के रक्कम अतिवृष्टीच्या कामासाठी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. त्यामुळे सदस्यांनी या आनुषंगाने तत्काळ प्रस्ताव दाखव करावेत, असे सूचित केले.