तसं पाहिलं तर लोकांना दुसºयांच्या गोष्टीत नाक खुपसणं जरा जास्तच आवडतं. ‘आपलं ठेवायचं झाकून अन् लोकांचं पाहायचं वाकून’ असं म्हणतात ते काही खोटं नाही. लग्न होऊन काही महिने लोटतात तोच मित्रमंडळी विचारायला लागतात, ‘मग काय गोड बातमी?’ नातेवाईकांतही याच विषयावर कुजबुज सुरूच असते. अहो, नाही म्हटलं तरी दडपण येतं ना त्या जोडप्यांवर! पण दुनियादारी ही अशीच. त्यात काही वर्षांनंतरही अपत्य होत नाही म्हटल्यावर तर काही खरं नाही. न विचारलेले फुकटचे सल्ले ऐकून ऐकून कान किटून जातात ना! यातले बहुतेक सल्ले काय असतात? कुठल्यातरी भोंदुबुवांचा पत्ता दिला जातो अन् अमक्यातमक्याला कसा गुण आला हे पटवून दिलं जातं.
गंडेदोरे बांधून अन् अंगारा-धुपारा करून मुलं होत असती तर लग्न करायची तरी काय गरज आहे हो? आता हेच बघा ना, वैराग परिसरातल्या एका महिलेस अपत्य होत नव्हतं म्हणून ती कुण्या भोंदूच्या जाळ्यात सापडली. लोकांच्या फुकटच्या सल्ल्यानंच हा भोंदू गाठला. त्यानं म्हणे कसल्या गोळ्या दिल्या अन् या महिलेनंही त्या इमानदारीनं खाल्ल्या. गोळ्या खाऊन अपत्य तर झालं नाहीच, पण वजन मात्र भलतंच वाढलं. अखेर या भोंदूला पकडून या महिलेनं पोलीस ठाणं गाठलं. गोळ्या द्यायला हा काय डॉक्टर होता? पण सगळं चालतंच हो या दुनियादारीत. ‘पैशाची जादू लय न्यारी..’ हेच खरं! असल्या लबाडांच्या नादाला लागून चक्क नरबळी देतात हो काही उलट्या काळजाची माणसं. कथित गुप्तधन तर मिळत नाहीच, पण मिळते ती तुरुंगाची हवा!
माणूस भलेही चंद्रावर गेला, पण ही दुनियादारी अजूनही सुधारायचं नाव घेत नाही. डॉक्टरांपेक्षा भोंदूवरच जास्त विश्वास. ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए’ हे काही खोटं नाही. कष्ट करून चार पैसे मिळविण्यापेक्षा भोंदुगिरी करून प्रचंड कमाई करता येते ना! बरं याच्याकडून गंडा घालून गंडवून घेणारे शोधत जातात ना खिसा रिकामा करायला. विज्ञानाच्या केवढ्या गप्पा मारतो राव आपण. विज्ञानानं एवढी प्रगती केलीय, तरीही आपण भोंदुबुवांची दाढी सोडायला काही तयार होत नाही. जन्मदात्या बापानं काही सांगितलं तरी ऐकणार नाहीत, पण भोंदूनं काहीही सांगितलं तरी ते करायला एका पायावर तयार! समाज माध्यमातही असले काही नमुने आहेतच की! ‘अकरा जणांना हा मेसेज पाठवला की दोन दिवसात चांगली बातमी ऐकायला मिळेल अन् दुर्लक्ष कराल तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल’ असे अकलेचे तारे तोडणारे या विज्ञानयुगातही काही कमी नाहीत.
तो ‘गुरुजी’ म्हणे! त्याच्या शेतातले आंबे खाल्ले की मुलगा होतो. आता काय बोलावं तुम्हीच सांगा. पुराणकाळात अशा सुरस कथा ऐकायला मिळतात खºया, पण आज विज्ञानयुगातही असे आंबे? आजच्या काळात कसं मान्य होईल हो हे? समाजमाध्यमानं तर पार ‘धुलाई’ करून टाकली या बेताल बडबडीची! या गुरुजीच्या आंब्यातला हा रस अजून गळत असतानाच औरंगाबादच्या खुलताबाद इथं अजून एक झाड समोर आलं अन् भोंदू मौलवी दुनियेसमोर आला. आंबेवाल्या गुरुजीच्याही पुढं दोन पावलं टाकली ना यानं! वाट्टेल ते दावे करताना शरम वाटायचं काहीच कारण नाही ना! लोकं फसताहेत अन् याची तिजोरी भरतेय. विज्ञानाशी काय देणं-घेणं असणार यांचं? आपला ‘धंदा’ मस्त चालला म्हणजे झालं! अशा लबाडांना फसणाºया लोकांनी आपली बुद्धी नक्की कुठं गहाण टाकलेली असते, त्यांनाच माहीत. आशेचं झाड म्हणे! दर्ग्याच्या मागच्या बाजूच्या या झाडाचं फळ खाल्लं की मुलगी होते अन् पुढच्या झाडाचं फळ खाल्लं की म्हणे मुलगा होतो. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे, तृतीयपंथीयांनाही अपत्यप्राप्ती होते म्हणे! दर्गा परिसरातच असलेल्या ‘परियों का तालाब’मध्ये गुरुवारी रात्री महिलांनी विवस्त्र होऊन स्नान केलं की सगळे दुर्धर रोग एका स्नानात बरे होतात.
कुमारिकेनं असं स्नान केलं की लगेच तिचं लग्न जमतं. आजच्या युगात काय काय दावे करतो इथला मौलाना मुजावर! बरं, लोकांनीही का फसावं बरं? वर्षांनुवर्षे हे सगळं चाललंय म्हणतात. आजवर किती जणांना गंडा बसला असेल याचा काही हिशोब? बरं झालं, अंनिसच्या शहाजी भोसले यांनी या मौलवीचा बुरखा फाडला. काही नाही हो, खूप झालेत या दुनियादारीत कुणी ‘आंबे’वाले तर कुणी ‘खंबे’वाले!
निसर्गाच्या विरोधात जाऊन दावे करायचे अन् निसर्गाचाच आधार घ्यायचा! लोकांजवळ पैसा आहे पण अक्कल नाही, असंच म्हणायची वेळ आलीय ना! तृतीयपंथी लोकांना अपत्य? विवस्त्र होऊन महिलेनं स्नान केलं की मोठमोठे आजार गायब? झाडाचं फळ खाल्लं की मूल जन्माला येतं? विज्ञानयुगात काय हा लाजिरवाणा प्रकार! सगळ्या दवाखान्यांना कुलूपच ठोकावं की मग! पैसा मिळविण्यासाठी कुणाच्या ‘सुपीक’ डोक्यातून काय सडकी कल्पना येईल, हे काही सांगता येत नाही बुवा! ‘पैसा कुछ भी करता और करवाता है’ हेच खरं! आपल्या बुद्धीचा तरी वापर करा.
विज्ञानानं शहाणपण दिलं तरीही या लोकांना त्यांची ‘शिकार’ सहज सापडते राव! चमत्काराचे अन् भूतप्रेतांची बाधा घालवण्याचे दावे करणारे आजही गावागावांत आहेत अन् अक्कल गहाण टाकणाºयांची संख्याही वाढतच आहे. चाललंय तरी काय या दुनियादारीत! लाजेलाही लाज वाटावी, पण या लबाडांना नाही वाटत. जादूटोणाविरोधी कायदा करावा लागला याच विज्ञानयुगात. श्रद्धेचा बाजार मांडून कमाई करणाºयांचे पेव फुटले आहे, पण अंधभक्तांचे डोळे काही उघडत नाहीत. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावोनिया राख, डोळे झाकोनी करती पाप...’
-अशोक गोडगे (कदम)(लेखक विचारवंत आहेत)