सोन्याचा चमचा घेतलेल्यांना गरिबी कशी काय कळणार? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 08:16 AM2024-10-09T08:16:32+5:302024-10-09T08:17:36+5:30
काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजना म्हणजे टेबलाखालून दिलेली लाच आहे, अशी टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या घरात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना गरीब महिलांचे दुःख काय कळणार, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खा. प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता मंगळवारी केली. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना अनुदान वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजना म्हणजे टेबलाखालून दिलेली लाच आहे, अशी टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका निकटवर्तीयाने नागपूर खंडपीठात योजनेविरोधात याचिका दाखल केली. ही योजना तत्काळ बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी काँग्रेस सावत्र भावाची भूमिका निभावत आहे.
शब्द फिरवणार नाही
अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना जाहीर केल्यावर विधानसभेत विरोधकांनी टीका केली. योजनेला पैसा कुठून आणणार, असे त्यांनी विचारले. राज्याचा अर्थमंत्री मी आहे. एखादी योजना आणताना आम्ही दहा वेळा विचार करू. जाहीर केल्यावर मात्र शब्द फिरवणार नाही, हे नक्की.