भारतामध्ये इस्लामच्या आगमनापूर्वीची स्थिती अल् बेरुनीने त्याच्या ‘किताबुल हिंद’ या ग्रंथात ‘विषमतेचा प्रदेश’ या शीर्षकाने केलेल्या उल्लेखातून स्पष्ट होते. विषमता, आर्थिक शोषण, सांस्कृतिक अमानवीपणाला अधोरेखित करणाऱ्या अनेक रुढींचा उल्लेख अल् बेरुनी प्रमाणेच अनेक मध्ययुगीन विद्वानांनी केला आहे. त्यामुळेच सुफी संतांनी केलेल्या मिशनरी कार्याला मध्ययुगीन इतिहासात अधिक महत्व प्राप्त होते. भारतातील सुफी संप्रदायातील चिश्ती शाखेचे संस्थापक ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे आहेत. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी जादुटोण्याच्या विरोधात दिलेल्या लढ्याचे दाखले अनेक समकालीन ग्रंथात उपलब्ध आहेत. सुफी संतांच्या चिश्ती शाखेने जमिनी स्तरावर इस्लामचा प्रसार करण्यापेक्षा जीवनाला आव्हान देणाऱ्या समस्यांना भिडण्याचा मार्ग अवलंबला होता. सुफींनी इस्लामकडे जगण्याला अधिक उन्नत करण्यासाठीचे माध्यम म्हणून पाहिले आणि त्याच दृष्टीतून त्यांनी चळवळीची आखणी केली.
भारतामध्ये सहभोजनाची परंपरा फक्त जात-वर्गांतर्गत होती. सर्व जाती-वर्गाचे लोक एकत्र येऊन जेवण्याची कल्पना देखील त्या काळात शक्य नव्हती. कनिष्ठ समजल्या गेलेल्या जातीतील लोकांना सामाजिक पातळीवर अतिशय तुच्छ वागणूक दिली जात असे. अशा काळामध्ये सुफी संत ईदोत्सवाच्या माध्यमातून या गरीब, दलित, कष्टकरी लोकांशी संवाद साधत. त्यांना आपल्या आश्रमात आणून सहभोजनात सामावून घेत. अन्नदानाच्या माध्यमातून त्यांच्या जगण्याला आधार देण्याचा प्रयत्न केला जात असे. सुफी संतांनी रमजानच्या काळात दिल्या जाणाऱ्या जकातीचा वापर करुन भारतात मोठ्या प्रमाणात हकिमखाने सुरु केले होते. या हकिमखान्याच्या माध्यमातून सुफींनी सर्वधर्मीय नागरिकांना मोफत उपचार देण्याचा प्रयत्न केला होता.
सुफींच्या आश्रमाला खानकाह म्हटले जाते. या आश्रमात विद्यालयांची स्थापना करुन सुफींनी शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. या शिक्षणासाठी लागणारा पैसा गोळा करण्यासाठीचे सर्वात मोठे माध्यम रमजान महिन्यातील दानधर्म असे. त्यातून मिळालेल्या पैशाचा निधीसारखा वापर केला जाई. त्याशिवाय सुफींनी रमजान महिन्यात प्रबोधनाचे जलसे आयोजित करुन उच्चवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सामान्य माणसांचे दुःख समजून घेण्यासाठी प्रवृत्त केले होते. सुफींच्या आश्रमात ‘दावत-ए-खास’ चे आयोजन केले जाई. दिल्ली येथली प्रख्यात सुफी संत हजरत निजामुद्दीन औलिया(र.) हे रमजानमध्ये ‘दावत-ए-खास’ चे आयोजन करीत असत. त्यांच्या या दावतचे अनेक किस्से प्रसिध्द आहेत. त्यांच्या खानकाह मध्ये खिलजी आणि तुघलक घराण्यातील सुलतान देखील येत असत. पण त्यांना कोणतेही विशेष सन्मान देण्याचे हजरत निजामुद्दीन औलिया(र.) यांनी नाकारले होते. रमजान महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘दावत-ए-खास’ मध्ये बादशाह, त्याचे अधिकारी, महाजन, मोठे व्यापारी दिल्लीतील सामान्य माणसांसोबत बसत असत. नावावरुन ही ‘दावत-ए-खास’ विशेष लोकांची मेजवानी वाटत असली तरी त्याचे स्वरुप मात्र समानतेचा संदेश देणारे होते. यावरुन अनेकदा निजामुद्दीन औलिया(र.) यांना प्रशासकीय अधिकारी, सरदार आणि बादशाहांच्या रोषास सामोरे जावे लागत असे. तरीही निजामुद्दीन औलिया(र.) यांनी रमजानमधील या दावतचे स्वरुप बदलले नाही. त्यांनी आयुष्यभर चिश्ती शाखेच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे स्वतःला राजकारण्यांचा आदर-सन्मान करण्यापासून रोखले होते.
रमजानच्या महिन्यात फक्त सुफी संतच नव्हे तर अनेक बादशाह, मोठमोठे मंत्रीही दानधर्म करीत असत. यामध्ये जहांगीरचा उल्लेख महत्वाचा ठरेल. जहांगीरने आपल्या वडिलांची स्मृती दिल्ली शहरात अनेक सराय बांधल्या होत्या. या सरायमध्ये रमजानच्या काळात उपवासाच्या दोन्ही वेळेस मोफत जेवण दिले जात असे. या जेवणाच्या पंक्तीत कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला सहभागी होण्यास मनाई नव्हती. त्यामुळे दिल्लीत येणाऱ्या व्यापारी आणि प्रवाशांची रमजान महिन्यात मोठी सोय होत असे. जहांगीरच्या पूर्वी काही प्रमाणात अकबर आणि बाबरनेही रमजान महिन्यात दानधर्म केल्याचा उल्लेख आढळतो. फक्त दिल्लीचे बादशाहच नाही तर अनेक प्रादेशिक राजवटीतही हीच पध्दत प्रचलित होती. बिजापूरात आदिलशाही राजवटीतही अनेक उपक्रम राबवले जात. त्यामाध्यमातून सामान्य माणसाशी संवाद साधण्याचा प्रयत्न आदिलशाही सुलतान करीत असत. त्यामुळे रमजान ईदचा काळ हा सामान्य माणसाच्या जगण्याला आधार देण्याचा काळ होता. त्याचा इतिहासही याच पध्दतीच्या संदर्भांनी भरलेला आहे.
- आसिफ इक्बाल
रिसर्च स्काॅलर