उडगी : सध्या ४० पेक्षा जास्त तापमान वाढलेले असल्याने वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाच्या वतीने तालुक्यातील उडगी, काझीकणबस, किरनळ्ळी, वागदरी, कर्जाळ, बोरेगाव येथील वनक्षेत्रात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़वनविभागाने वनक्षेत्रात बनविलेल्या कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे.
वनक्षेत्रात विविध प्रकारच्या पशुपक्षी आणि प्राण्यांचा अधिवास आहे. मात्र पावसाळ्यातील तीन महिने वगळता इतर महिने मात्र प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ त्यामुळे तालुक्यातील सर्वच पाणवठ्यात पाणी सोडण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत़ उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे बरेच पशुपक्षी हे पाण्यासाठी स्थलांतर करतात़ त्यामुळे वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढवावी आणि पक्ष्यांची तहान भागवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पक्षीमित्र गिरमल जमादार यांनी केली होती.
८४५ हेक्टर वनक्षेत्र- अक्कलकोट तालुक्यात ८४५ हेक्टर वनक्षेत्र आहे़ ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे़ जलस्रोतही कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात उडगी (२), काझीकणबस, किरनळ्ळी, वागदरी, कर्जाळ, बोरेगाव या ठिकाणी प्रत्येकी एक वनक्षेत्र आहे़
सध्या तापमान वाढल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी वनविभागातर्फे पाणवठ्यात नियमित टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. संचारबंदी काळातसुध्दा मुक्या प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही़ - प्रवीणकुमार बडगे,उपवनसंरक्षक, सोलापूर