मंगळवेढा : नवजात अर्भकाला भीमा नदीतील पुराच्या पाण्यात मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञाताकडून फेकून देण्याचा प्लॅन फसला. महापुरात फेकताना समोरून मच्छीमार आले आणि त्या दोघांनी अर्भकाला शेणात टाकून पळाल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान घडली.
मंगळवेढा तालुक्याच्या हद्दीलगत असणाºया उचेठाण--सरकोली(ता पंढरपूर) बंधारा कडे पहाटे मच्छिमार जात असताना त्यांना खंडोबा गल्लीत लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता शेण-खड्ड्याच्या शेजारी पुरुष जातीचे अंदाजे एक दिवसाचे नवजात अर्भक कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत दिसले. थंडी आणि भुकेनं व्याकुळ झाल्यानं रडत होते.सदर अर्भकास सरकोली- उचेठाण बंधाºयावरून वाहत्या पाण्यात फेकून देण्याचा अज्ञात व्यक्तीचा प्रयत्न होता परंतु समोरून मच्छिमार येत असल्याचे दिसल्याने शेण-खड्याच्या शेजारी ठेवून अज्ञात दोन व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
मच्छीमार नसते तर ते अर्भक महापुराच्या पाण्यात फेकून देण्याचे त्यांचे काळे कृत्य यशस्वी झाले असते मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याला बालकास जीवदान मिळाले. ते बाळ नुकतेच जन्माला आले असल्याने त्याच्या अंगावर सर्वत्र अस्वच्छता होती उपस्थित महिलांनी त्या बाळाच्या अंगाची सर्व स्वछता केली.
सरकोली ग्रामस्थ हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशनला कळवली. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन सदर बालकास मेडिकल चेकिंग साठी घेऊन गेले. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतरच नवरंगे बालकाश्रमात दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बालकांला कोणी या ठिकाणी सोडले याबाबतचा तपास पंढरपूर पोलीस ठाण्याचे वि.सी.काळे करीत आहेत.