सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथील भोजप्पा तांड्यावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकावर हल्ला करण्यात आला तरी डॉक्टरांनी माणुसकी विसरली नसल्याचे दिसून आले आहे. हल्ला करणाºयांच्या कुटुंबातील १८ जणांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे.
शनिवार, ६ जून रोजी सिव्हिलच्या प्रयोगशाळेकडून अहवाल आल्यानंतर त्यात कवठे येथील भोजप्पा तांड्यावर राहणाºया पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अहवाल मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी, तिºहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोडसे हे पथकासह रवाना झाले. भोजप्पा तांड्याच्या प्रवेशद्वारावर एका तरुणाने गाडी अडवून हुज्जत घातली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांना शिवीगाळ करणाºया तरुणास समजावून सांगण्यासाठी डॉ. गोडसे पुढे सरसावल्यावर त्या तरुणाने पित्याच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केला. यात डॉ. गोडसे जखमी झाले. त्यानंतर सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे अधिकारी तेथे आले व त्यांनी हल्लेखोरावर कारवाई केली. कोरोना प्रतिबंधासाठी काम करणाºया वैद्यकीय पथकावरच हल्ला झाल्याने प्रकरण गंभीर बनले. त्यामुळे पथकाने येथे काम न करण्याचा निर्णय घेतला; पण दुसºया दिवशी त्याच कुटुंबातील व्यक्तींना त्रास होत असल्याचा फोन आला.
डॉक्टरांनी झालेले भांडण विसरून माणुसकीच्या नात्याने तातडीने त्या कुटुंबीयांना मदत केली. त्यांच्या घरी अॅम्ब्युलन्स पाठवून सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू झालेल्या सात जणांना थेट विमा रुग्णालयात उपचारासाठी हलविले तर इतर अकरा जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठविले.
रुग्णालयात उपचार घेणाºया ‘त्या’ सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. डॉक्टरांनी वेळेत मदत केल्याने त्यांच्यावरील धोका टळला आहे. रुग्णसेवा हीच ईशसेवा मानून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले असल्याचे डॉ. गोडसे यांनी सांगितले.