पंढरपूर : कोरोना महामारी मध्ये प्रथम दर्शनी काम करणाऱ्या रांगेत आरोग्य विभागानंतर दुसरा क्रमांक पोलीस प्रशासनाचा नंबर लागतो. जिवाची पर्वा न करता काम करणारे कर्मचारी म्हणून पोलिस विभागाला ओळखले जाते. तसाच प्रत्यय पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे आलेला आहे. कोरोनाचा रुग्ण आहे समजले, की सर्वजण अंतर ठेवून वागतात. मात्र कोरोनाने मृत्यू होऊन देखील एका व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्याचे काम करकंब पोलिसांनी केले आहे.
सांगवी (ता. पंढरपूर) येथील ६० वर्षीय व्यक्तीचे कोरोनामुळे रविवार (२५ एप्रिल) रोजी मृत्यू झाला. या व्यक्तींच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती देखील पॉझिटिव्ह असलेने पंढरपूर येथे विलीगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल होते. यामुळे या मयत व्यक्तीचे अंत्यसंस्कारासाठी कोणच पुढे येत नसल्याने पोलीसांनीच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.करकंब पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश मुंडे, हवालदार सिरमा गोडसे, कॉन्टेबल अमोल घुगे यांनी पुढाकार घेवून अंत्यसंस्कार केले. सांगवी येथे मयताचे सुन व जावई यांच्या उपस्थितीत हा अंत्यसंस्कार पोलीसांनी केले.