सोलापूर : कोरोनापासून बचाव करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. यामुळे अनेक नागरिक पोलीस प्रशासनावर नाराज आहेत; पण पोलीस हे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी कारवाई करतात तसेच दिवसभर काम करताना त्यांच्या नजरेस काही गरजू उपाशीपोटी फिरतानाही दिसतात. या बेघरांना पोलीस दलातील काही कर्मचारी मदतीचा हात देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत.
राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी लागू केल्यामुळे अनेकांची त्यांची रोजीरोटी थांबली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना जास्त बसला आहे. त्यांच्या मानाने सरकारी कर्मचारी किंवा इतर व्यक्ती ज्यांच्याकडे थोडी फार संपत्ती आहे, अशा व्यक्तींना जास्त त्रास झाला नाही; पण अनेकांचे हातावरील पोट असल्यामुळे त्यांचे उत्पन्न मात्र थांबलेले आहे. यामुळे त्यांच्यासमोर एका वेळेची पोटाची खळगी ते भरू शकत नाहीत. अशा अनेक बेघर, सुशिक्षित बेरोजगार रस्त्यावरून फिरत असताना दिसतात. अशा लोकांना मदतीसाठी वर्दीतील माणूस ही धावतात.
सोलापूर शहरातील अनेक पोलीस कर्मचारी हे अशा प्रकारे मदत करताना दिसतात. पोलीस नाईक नागनाथ साबळे हे मागील अनेक महिन्यांपासून आठवड्यातून एक दिवस बेघरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी पुढे सरसावले आहेत. गुरुवारी साबळे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ गुरुवारी सायंकाळी ५० पेक्षा जास्त लोकांना अन्न दान केले. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील व्यक्ती इलाजासाठी किंवा अन्य कारणांसाठी शहरात आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. अशा व्यक्तींना गरज असल्यास रक्तदान करणे किंवा इतरांकडून रक्ताची मदत करून देणे. तसेच काही वेळेस वैद्यकीय इलाजासाठी किंवा अन्य कारणांसाठी पैशांची कमतरता भासल्यास त्या व्यक्तींना आर्थिक मदत करण्याचे कामही पोलीस अंमलदार कल्लप्पा देकाणे हे करतात. तसेच संतोष पापडे हेही सध्या आपल्या गावी परत जाणाऱ्या कामगारांना व बेघरांना एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, सिद्धेश्वर मंदिर परिसरात आणि इतर ठिकाणी थांबलेल्या सर्वांना घरून जेवणाचा बॉक्स आणून वाटण्याचे काम करत आहेत.
बिस्कीट वाटण्यासाठी गाडी बदलली
कामावर ये-जा करताना अनेक घटना मला विचलित करत होत्या. यामुळे त्यांना मदत करण्यासाठी मी नेहमी सोबत दूध आणि फळ ठेवत असतो. सध्या संचारबंदी असल्यामुळे गरजू आढळल्यास त्यांना मी मदत करतो. जास्त वस्तू मदत करण्यासाठी सोबत घेऊन जाता यावे यासाठी मी मोपेड गाडी वापरत आहे, अशी माहिती नागेश कांबळे यांनी दिली.
माझी बदली नुकतीच सोलापुरात झाली आहे. मी मिरजला असताना मागील लॉकडाऊन वेळेस माझा अर्धा पगार खर्च करून गरजूंना मदत केली. सोलापूर आता काही प्रमाणात किराणा वस्तू गरजूंना देण्यास सुरुवात केली आहे.
-इंद्रजीत वर्धन, सहायक पोलीस निरीक्षक