बार्शी येथील बाजार समितीत सोलापूर, उस्मानाबाद व अहमदनगर जिल्ह्यातून विक्रीसाठी शेतमाल येत आहे. तुरीचे दर हे जानेवारी महिन्यात साडेपाच हजारांपर्यंत खाली आले होते. त्यात हळूहळू वाढ होत गेली. १२ दिवसांपूर्वी तूर ६ हजार होती. मागील आठवड्यात यात ६०० रुपयांनी वाढ होऊन ६८०० रुपये दराने विक्री झाली. त्यानंतर पुन्हा दर घसरले. मात्र, शनिवारी पुन्हा वाढ होऊन मळेगाव ता. बार्शी येथील शेतकरी मेजर हरश्चिंद्र नलवडे यांची तूर ही ६९०० दराने विक्री झाली. भागवत नांदेडकर यांच्या अडतीकडून खरेदीदार मोहन नाडर यांनी ती तूर खरेदी केली.
तसेच नवीन ज्वारीची देखील आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. ज्वारीचे दर टिकून आहेत. शनिवारी ज्वारी ही १३८० पासून ४५०० रुपये विक्री झाली. अद्याप बार्शी व परिसरात ज्वारीची काढणी सुरू झालेली नाही. ज्वारी आणि तूर प्रत्येकी पाच हजार कट्ट्यांपेक्षा जास्त आवक बाजारात सुरू आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी दिली.