सोलापूर : उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यात जाण्यासाठी बुधवारी रेल्वे येणार असल्याचे फोन परप्रांतीय मजुरांना करण्यात आले. शेकडो मजूर राहते घर सोडून बुधवारी पहाटे सोलापूररेल्वेस्थानकावर हजर झाले, परंतु काही वेळातच पोलिसांनी या मजुरांना हाकलून दिले. दिवसभर अन्न-पाण्याच्या शोधात हे मजूर शहरात फिरत असल्याचे पाहायला मिळाले.
उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील दीपककुमार सरोज आणि त्यांचे १०० हून अधिक सहकारी बुधवारी सकाळी छत्रपती संभाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाखाली बसले होते. दीपककुमार म्हणाले, आम्ही पाकणी भागात राहतो. या भागातील कंपन्या, रस्ते कामावर मजूर म्हणून काम करतो. पाकणी परिसरात भाड्याने खोल्या घेऊन राहिलो आहोत. गावी जाण्यासाठी तहसील कार्यालयाला अर्ज केला होता. उत्तरप्रदेशला जाण्यासाठी बुधवारी रेल्वे सोडण्यात येणार असल्याचे आम्हाला मंगळवारी दुपारी फोनवरून सांगण्यात आले. आमच्यातील सर्वांनाच फोन आले होते. सर्वांना फोन आल्यामुळे आम्ही मंगळवारी रात्रीच घर मालकांना खोलीच्या चाव्या दिल्या. पहाटे चालत रेल्वे स्थानकावर पोहोचलो. स्थानकाबाहेर थांबलेल्या पोलिसांनी आम्हाला हाकूलन दिले. पुन्हा पाकणीला गेलो तर तिथे घर मालकाने चाव्या देण्यास नकार दिला. पुन्हा इकडे येऊ नका म्हणून सांगितले. आता परत सोलापुरात आलोय.
सरकार, प्रशासन आमचा जीव घेणार आहे का? रेल्वे येणार नव्हती तर आम्हाला फोन का केले?, असा सवालही दीपककुमार आणि त्याच्या सहकाºयांनी उपस्थित केला.
केवळ फोन आल्यामुळेच गोंधळ- शहरातील सात रस्ता, रेल्वेस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संभाजी महाराज चौक या परिसरात बुधवारी सकाळी शेकडो परप्रांतीय बांधव बसलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास कदम आणि त्यांच्या सहकाºयांनी या परप्रांतीयांची भोजनाची व्यवस्था केली. फोन आल्यामुळेच आम्ही घर सोडून रस्त्यावर आलो, असेही सर्वजण सांगत होते.
अधिकाºयांनी दाखवले एकमेकांकडे बोट- परप्रांतीय रस्त्यावर आले होते त्यावेळी सर्व प्रमुख अधिकारी शासकीय विश्रामगृहात पालक सचिवांसोबत बैठकांमध्ये व्यस्त होते. दुपारी दोनपर्यंत ही बैठक सुरू होती. या काळात अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याकडे याबाबत संपर्क साधला असता त्यांनी उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांना फोन करण्यास सांगितले, परंतु उपजिल्हाधिकाºयांनी परप्रांतीयांचे फोनच घेतले नसल्याचे दीपककुमार आणि त्यांच्या सहकाºयांकडून सांगण्यात आले. प्रशासनात सावळा गोंधळ दिसून आला.
परप्रांतीय लोक आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्यात एक संवाद गरजेचा आहे. तो सध्या बिलकुल बंद आहे. अधिकाºयांच्या हाताखालचे व्यवस्थित काम करीत नसल्याचे दिसते. परप्रांतीय लोकांना रेल्वे सुरू होणार असल्याचे फोन कोणी केले याची चौकशी झाली पाहिजे. मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी अधिकाºयांचे फिरते पथक नियुक्त करण्यात यावे.-हसीब नदाफ, प्रदेश सरचिटणीस, मौलाना आझाद विचार मंच.