सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या ऑपरेशन परिवर्तन गटातील मुलांकरिता आयोजित नोकरी मेळाव्यात १०० हून अधिक तरूण-तरूणींना जॉब मिळाला आहे. दरम्यान, मुलाखत झाली, शॉर्टलिस्ट तयार करून लवकरच त्यांना विविध कंपन्यांमधील रिक्त असलेल्या विविध पदावर शैक्षणिक पात्रतेनुसार काम करण्याचे पत्र देण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण व सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने चिंचोळी एमआयडीसी येथील उद्योग भवनामध्ये नोकरी मेळावा घेण्यात आला. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, सचिव वासुदेव बंग, उपाध्यक्ष गणेश सुत्रावे यांनी दीपप्रज्वलन केले. यासाठी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राम रेडी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभारी पोलीस उपअधीक्षक जोतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, राखीव पोलीस निरीक्षक आनंद काजुळकर व पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे सहसचिव रामेश्वरी गायकवाड, कार्यकारी सदस्य तारासिंग राठोड, शिवशंकर आंधळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक गणेश सुत्रावे यांनी केले.
-----------
११ कंपन्यांचा होता सहभाग
या नोकरी मेळाव्यात चिंचोळी एमआयडीसीमधील ११ कंपन्यांचा सहभाग होता. त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी रिक्त पदाच्या जागेनुसार उपस्थित तरूण-तरूणींची मुलाखत घेतली. यामध्ये शैक्षणिक पात्रता, संभाषण कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, संगणकाचे ज्ञान आदी बाबींवर योग्य तो विचार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केला.