शीतलकुमार कांबळे, सोलापूर :पर्यावरणासंबंधी उपक्रमात लहान मुले सहभागी होत असतात. मात्र, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग तसा कमीच असतो. यावेळी पर्यावरणप्रेमींच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शेकडो चिमण्यांचे घरटे साकारले.
ए.जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पर्यावरण संवर्धन व कृत्रिम घरटे निर्मिती कार्यशाळा झाली. आंतरराष्ट्रीय फुलपाखरू दिन, जागतिक चिमणी दिन, जागतिक जल दिन, जागतिक वन दिन, जागतिक हवामान यांचे औचित्य साधून कार्यशाळा झाली. कार्यशाळेत बनवलेली पर्यावरण पूरक घरटे व पक्षांना पिण्यासाठी जलपात्र वितरित करण्यात आले. "एक कोपरा चिऊताईसाठी" या घोषणेने कॅम्पस परिसर दणाणून गेला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाईल्ड लाईफ कॉनझर्वेशन असोसिएशनचे मार्गदर्शक शिवानंद हिरेमठ, अध्यक्ष अजित चौहान, सचिव संतोष धाकपाडे, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे उपस्थित होते.
प्रा. अनिल लिगाडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुख्याध्यापक डॉ. व्ही. व्ही. पोतदार, शिवानंद हिरेमठ, अजित चौहान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. आर.व्ही. दरेकर, प्रा. टी. डी. मासळेकर, प्रा. पी.एस. स्वामी, प्रा. एस.एम. बिराजदार, प्रा. पी. आर. हेडगिरे, प्रा. के.आर. मामडयाल, प्रा. आर.डी. मादगुंडी , प्रा. ए.एस. लिगाडे, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी , डॉ. एस. बी. गडवाल, आर.बी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.