होटगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या आवारात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. या परिसरात राज्याबाहेरून आलेले अनेक मजूर, ठेकेदार आणि कामगार आहेत. त्यांचा स्थानिकांशी फारसा संपर्क नाही. तरीही दररोज त्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय एनटीपीसी प्रशासनाने घेतला. या चाचण्यांमध्ये रोजच पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहेत.
चाचणीत मजुरांची संख्या सर्वाधिक आढळली. मजूर आणि कामगार परिसरात वास्तव्यास आहेत. सर्व जण एकत्रित काम करतात स्थानिकांची संख्याही मोठी असून, परस्पर संपर्कामुळे कामगार, मजूर आणि अधिकाऱ्यांना बाधा मोठ्या प्रमाणात झाली आहे. एनटीपीसीच्या हॉस्पिटलमध्ये अनेकांना प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.
प्रमुख अधिकाऱ्यांना लागण
एनटीपीसीमध्ये परप्रांतीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रकल्पाच्या परिसरात या अधिकाऱ्यांची वसाहत आहे. सामान्य नागरिकांशी त्यांचा क्वचितच संबंध येतो, तरीही या वसाहतीत वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालाच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वीपासून कडक निर्बंध
भारतात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून एनटीपीसी व्यवस्थापनाने त्यांच्या सर्वच प्रकल्पांमध्ये कडक निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली होती. मागील वर्षी सलग पाच महिने या परिसराचा संपर्क बंद केला होता. सुरक्षाव्यवस्था कडक केली होती.