राकेश कदम
सोलापूर : जुळे सोलापूर परिसरात एक हजार स्क्वेअर फूट जागा घ्यायची असेल तर दहा ते वीस लाख रुपये मोजावे लागतात. परंतु, आसरा सोसायटी, कल्याणनगर, मजरेवाडी या परिसरातील रेल्वेच्या जागेवर शेकडो लोकांनी अगदी फुकटात कब्जा केला आहे. महापालिकेचे रस्तेही काही लोकांनी गिळंकृत केल्याचे येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी कोट्यवधी रुपयांच्या या जागेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे स्थानकापासून कुमठे गावापर्यंत रेल्वेची शेकडो एकर जमीन आहे. या जमिनीवरील अतिक्रमणाच्या वादावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी एनटीपीसीसाठी स्वतंत्र ब्रॉडगेज लाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे काम सुरू झाल्यानंतर कल्याणनगर, आसरा सोसायटी परिसरातील नागरिकांनी त्याला हरकत घेतली होती. त्यामुळे हे काम प्रलंबित राहिले. रेल्वेने कारवाई थांबविली. तरीही या भागात अतिक्रमण सुरूच राहिले.
गेल्या चार महिन्यांत आसरा सोसायटी परिसर, कल्याणनगर, मजरेवाडी हद्दीत बिनदिक्कतपणे पत्र्याचे शेड टाकण्यात आले आहेत. आसरा रेल्वे पुलाजवळ दुकाने थाटण्यात आली आहेत. या भागातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दत्त मंदिराजवळ काही लोकांनी दुकाने थाटून ती भाड्याने दिली आहेत. जागा रेल्वेची आणि भूमाफिया भाडे वसुली करीत आहेत. कल्याणनगर भाग दोन आणि तीनजवळ गेल्या १५ दिवसांत ५० पेक्षा अधिक लोकांनी पत्र्याचे शेड मारले आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी या ठिकाणी वीज जोडणी दिली आहे.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर- कल्याणनगर भाग तीन परिसरात मोठा नाला आहे. त्यात गवत वाढलेले आहे. घाणीचा, डासांचा मोठा उपद्रव आहे. लोक त्या बाजूलाच घरे बांधून राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आहे. आम्ही मोलमजुरी करतो. शहरात भाड्याने राहण्याची ऐपत नाही. ही पडीक जागा आहे. म्हणून इथे पत्राशेड मारून राहतोय, अशा व्यथाही या भागातील महिलांनी मांडल्या.
वीज वितरण अधिकाºयाचे असेही उत्तर...- जागा कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे आम्ही पाहत नाही. वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडे एक अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. जागेची कागदपत्रे नसतील तर नमुना १ संलग्नमधील तरतुदीनुसार दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संबंधित व्यक्तीने शपथपत्र द्यायचे. कल्याणनगर भागातील ३० पेक्षा अधिक लोकांनी गेल्या महिनाभरात अशी शपथपत्रे दाखल केली आहेत. ही जागा रेल्वेची असल्याचे त्यांना मान्य आहे. लोक तिथे राहतात. उद्या साप, विंचू किंवा इतर प्रकारचा अपघात घडू नये, याची काळजी म्हणून त्यांना वीज जोडणी दिली आहे. लोक राहतात तर राहू द्या. त्याकडे एवढे लक्ष द्यायची गरज नाही. - अमोल पंढरी, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी
रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे माहीत नाही. तुमच्याकडे फोटो असतील तर ते आम्हाला व्हॉट्सअॅपवर पाठवा. आम्ही पाहून घेतो. - गौतम कुमारवरिष्ठ मंडल अभियंता.