माळशिरस : आळंदी-मोहोळ राष्ट्रीय महामार्गावर मांडवे (ता. माळशिरस) हद्दीत प्रवेश होताच शेकडो वर्षांपूर्वीच्या झाडामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेला बोगदा लागताच ५० फाट्याचे नाव आपोआप तोंडी यायचे. मात्र सध्या सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे शेकडो वर्षांचे मोठमोठे वृक्ष काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यामुळे या परिसरात विसावणाºया पक्ष्यांच्या घरट्यांबरोबर सावलीत व्यवसाय थाटून संसार चालविणाºया कुटुंबांची सावलीच हरपली आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आळंदी-पंढरपूर- मोहोळ राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाली. यामुळे या महामार्गावर आधुनिक सुविधांची स्वप्नं गावकºयांनी बघितली. यानंतर सर्व्हे होऊन सध्या कामाला सुरुवात झालेली आहे. मांडवे गावच्या हद्दीत शेकडो वर्षांपूर्वीचे वृक्ष म्हणजे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा थांबा होता.
या झाडांच्या गर्द सावलीत रसवंतीगृह, चहा, वडापाव, फळभाज्यांसह विविध लघुउद्योजकांनी आपली दुकाने थाटली होती. या ठिकाणी प्रवास करणारे अनेक वाटसरु थांबून विश्रांती घेत असत. यामुळे या व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत तयार झाला होता. मात्र हे वृक्ष तोडल्यामुळे या वृक्षावरील शेकडो पशू-पक्ष्यांबरोबर आपले संसार चालविणाºया लघुउद्योजकांची सावली हरपली आहे.
मांडवे गाव व तालुक्यातील बहुतांश लोकांकडून या वृक्षतोडीबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. विकासाच्या दृष्टीने पावले उचलणे काळाची गरज असल्यामुळे यासाठी विरोध झाला नाही. याबाबत वृक्षप्रेमी, संस्था, व्यक्ती व प्रशासनाकडून या महामार्गाचे काम सुरू असतानाच वृक्षलागवड होणे आवश्यक आहे.- रितेश पालवे, ग्रामस्थ, मांडवे