धायटी येथील मल्हारी बाळू पुजारी (वय ३०) यांची पत्नी शीतल मल्हारी पुजारी (वय २२) ही सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास शेजारी असणारे गोविंद नारायण पाटील यांच्या शेततळ्यावर पाणी घेण्यासाठी सायफन टाकताना पाय घसरून पाण्यात पडली. यावेळी बुडणाऱ्या पत्नीला वाचवण्यासाठी पती मल्हारी याने शेततळ्यात उडी घेतली. मल्हारी यास पोहता येत होते; परंतु पत्नीला पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. दरम्यान, त्यांच्या घरातून मल्हारीच्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून वडील बाळू पुजारी त्यांच्या घराकडे आले असता त्यांना पती-पत्नी दोघेही दिसले नाहीत. त्यांनी शेततळ्याकडे जाऊन पाहिले असता सून शीतल पाण्यावर तरंगत होती, तर मुलगा मल्हारी दिसून आला नाही. ही घटना त्यांनी अजनाळे येथील व्याही तात्यासो सरगर व पोलीस पाटील प्रवीण गायकवाड यांना सांगितली.
शेततळ्यातील शेवाळलेल्या पाण्यामुळे कोणीही उतरण्याचे धाडस केले नाही. अजनाळे येथील शेततळ्यात बुडणाऱ्या गोताखोर टीमला पाचारण केले. त्यांनी सकाळी १०च्या सुमारास पती-पत्नीला पाण्यातून बाहेर काढले. घटनास्थळी सहा. फौजदार पवार, पोलीस नाईक गणेश मेटकरी यांनी धाव घेऊन पती-पत्नीचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस पाटील प्रवीण गायकवाड यांनी याबाबत खबर दिली.
मुलीच्या रडण्यामुळे घटना समजली
मृत मल्हारी व शीतल यांचे साधारण दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा महिन्याची मुलगी असून, तिचे नाव ऋतुजा आहे. तिच्या रडण्यामुळेच आजोबा बाळू पुजारी यांना मुलगा व सून शेततळ्याच्या पाण्यात बुडाल्याचे समजले. आई-वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे सहा महिन्यांची ऋतुजा पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.
फोटोओळ ::::::::::::::::
धायटी गावातील स्मशानभूमीत मृत मल्हारी पुजारी व शीतल पुजारी पती-पत्नीचा एकाच चितेवर अंत्यविधी केल्याचे छायाचित्र.