बार्शी : महिलेचा हात धरून तिच्या मनास लज्जास्पद वाटेल असे कृत्य करून विनयभंग करण्यात आला. त्यानंतर पती-पत्नी मारहाण केल्याप्रकरणी एका विरूद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
अधिक माहिती अशी की, पिडीत महिला ही आपल्या गावातील घरासमोर एकटी बसली होती, तेव्हां एक व्यक्ती तेेथे आला व त्याने तिच्या हाताला धरून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकारामुळे महिला मोठ्याने ओरडली, तेव्हां शेजारचे लोक धावत आले. दरम्यान तो व्यक्ती तेथून निघून गेला, पती घरी आल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. पतीने गावातील त्या व्यक्तीकडे जाऊन याबाबत जाब विचारला. तेव्हां त्याने पतीला ती मला आवडते. मी तिच्यावर प्रेम करतो, तुला काय करायचे ते कर असे म्हणून पती पत्नीस शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तुला बघुन घेतो अशी धमकी दिली.
पीडित महिलेने बार्शी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली, तेथे तिने सर्व प्रकार सांगितला, शिवाय त्या व्यक्तीने यापूर्वीही माझा हात धरून तु मला आवडतेस, चांगले कपडे घालतेस, दिसायलाही चांगली आहेस असे म्हणून विनयभंग केला होता असे सांगितले. आपली इज्जत जाईल म्हणून पिडीतेने कोणालाही याबाबत सांगितले नव्हते. तेव्हां पासून तो वाईट नजरेने पहात होता असे पोलिसांना सांगितले. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी बापूराव शिंदे (रा. बार्शी) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार दशरथ बोबडे करीत आहेत.