अक्कलकोट : हन्नूर चौकात बुधवारी झालेल्या विवाहितेच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या पतीला न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
३० जून रोजी हन्नूर चौकात पुतळाबाई शिवराज मलगोंडा (३३) या विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून आणि संपत्तीच्या वादातून उशीने तोंड दाबून खून करण्यात आला. याबाबत विवाहितेचा भाऊ बसवराज शेेेळके यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पती शिवराज बसवराज मलगोंडा यास पोलिसांनी अटक केली.
१ जुलै रोजी येथील न्यायाधीश गणेश नंदगवळे यांच्या न्यायालयासमोर उभे केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून इस्माईल बेसकर यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे विजय हर्डीकर यांनी काम पाहिले. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.